छळाच्या तक्रारीची दखल न घेणे ही गंभीर बाब, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; आदिती तटकरे यांची माहिती
By नारायण बडगुजर | Updated: May 22, 2025 20:17 IST2025-05-22T20:16:45+5:302025-05-22T20:17:33+5:30
यात कुचराई किंवा हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

छळाच्या तक्रारीची दखल न घेणे ही गंभीर बाब, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; आदिती तटकरे यांची माहिती
पिंपरी : हगवणे कुटुंबातील मोठ्या सुनेने छळाबाबत सहा महिन्यांपूर्वीच महिला आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र, आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करण्यात येत आहे. त्याचवेळी या तक्रारीची योग्य दखल घेतली असती तर त्यांना न्याय मिळाला असता. मात्र, यात कुचराई किंवा हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी दुपारी वाकड येथे वैष्णवी हगवणे हिच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री तटकरे म्हणाल्या, ‘‘कस्पटे कुटुंबाला न्याय देणे आवश्यक आहे. त्यांनी तक्रार केली असली तरी आणखी काही मुद्दे ते तक्रारीत नमूद करू शकतात. जेणेकरून ही केस स्ट्राँग झाली पाहिजे. संशयितांना कडक शिक्षा होण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता शासनाकडून केली जाणार आहे. हगवणे यांच्या मोठ्या सुनेने केलेल्या तक्रारीची दखल न घेणे ही गंभीर बाब आहे. महिला आयोगामधील कोणी किंवा पोलिसांनी यात हलगर्जीपणा केला असल्यास त्याबाबत चौकशी करण्यात येईल.’’