पुनावळे आणि चिखली येथील आरएमसी प्लॅन्टवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: April 23, 2024 18:31 IST2024-04-23T18:30:54+5:302024-04-23T18:31:19+5:30
महापालिकेच्या हद्दीत विनापरवाना व्यवसाय आणि वायू, ध्वनी प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार

पुनावळे आणि चिखली येथील आरएमसी प्लॅन्टवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई
पिंपरी : शहरात अनधिकृतपणे सुरु असलेल्या पुनावळे व चिखली येथील आरएमसी प्लॅन्टवर महापालिकेने कारवाई करत सील करण्यात आले. महापालिकेच्या हद्दीत विनापरवाना व्यवसाय आणि वायू, ध्वनी प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
शहरातील आरएमसी प्लॅन्ट मधून मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धूळीमुळे नागरिकांना श्वसनाचा तसेच त्या प्रकल्पांमधून निघणाऱ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असून त्याबाबत महापालिकेच्या पर्यावरण विभागास तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने मे. एस.व्ही.टी.एन.कंन्स्ट्रक्शन प्रा.लि. तर्फे सोमानी टॉवर्स, प्लॉट नं. २५, गायकवाडनगर, पुनावळे पुणे तसेच ऐश्वर्यम हमारा, आर.एम.सी. (रेडीमिक्स क्रॉक्रीट) प्लॅन्ट चिखली येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील तसेच महापालिकेकडील ना-हरकत दाखला व इतर अनुषंगिक आवश्यक असणारी परवानगी घेणे अनिवार्य असते. परंतु पाहणीवेळी ही परवानगी न घेता अनधिकृतपणे व्यवसाय चालवित असल्याचे महापालिकेच्या पथकाच्या निदर्शनास आले होते.
पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, प्रदीप महाले, जगन्नाथ काटे, बाबासाहेब ढोकळे, कनिष्ठ अभियंता स्वप्निल पाटील, गोरक्षनाथ करपे तसेच एमएसएफ व मेस्को जवानांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून कारवाई केली.