वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 02:58 IST2018-02-02T02:58:36+5:302018-02-02T02:58:46+5:30
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आणि विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर अपघातामध्ये मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढली असून, त्यामध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघात
मोशी : पिंपरी-चिंचवड शहराचा विकास आणि विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर अपघातामध्ये मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढली असून, त्यामध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
बहुतांश अपघात हे चालकांच्या चुकीमुळेच होतात. वाहनात तांत्रिक बिघाड होऊन अपघाताचे प्रमाण फारच कमी आहे. यामुळे महामार्ग किंवा शहरात वाहन चालविणाºयांना विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे. मात्र आपल्याकडे प्रशिक्षणाशिवाय वाहन चालविणाºयांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्याची रुंदी तर वाढली; मात्र अपघातांची संख्याही वाढली आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने नागरिक स्वत:ची दुचाकी वाहने प्रवासाकरिता वापरतात. त्यामुळे दुचाकी अपघातांत मृत्युमुखी पडणाºयांची संख्या जादा आहे.
दिवसा प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलीस असतात. मात्र रात्रीच्या वेळी पोलीस नसल्याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. भरधाव वाहन चौकात आल्यावर त्याचा दुसºया वाहनाशी अपघात होतो. चौकात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयामुळे अशा अपघातात चूक कोणाची, हे समजत असले तरी गेलेला जीव परत येऊ शकत नाही. हेल्मेट दुचाकीला अडकवून दुचाकी चालविणाºया एका २२ वर्षीय विवाहित तरुणीचा रस्ता दुभाजकाला धडकून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना याच आठवड्यात भोसरी येथे घडली. जर त्यांनी हेल्मेट घातले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता.
जखमींवर वेळेत उपचार नाहीत
अपघात झाल्यावर अनेकदा जखमी कित्येकवेळ रस्त्यावर पडून असतो. मात्र नागरिक त्यास रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करीत नाहीत किंवा पोलिसांनाही कळवत नाही. त्यापैकी काही जण जखमीचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात. जरी पोलीस आले तरी रुग्णवाहिका येण्यास उशीर होतो. अनेकदा गंभीर जखमी रुग्णास वायसीएम रुग्णालयातून ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देतात. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर वेळ वाया जात असल्यामुळे जखमींना वेळेत योग्य उपचार मिळत नसल्याने जीव गमवावा लागत आहे.
पोलिसांकडून योग्य उपाययोजना
वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, नशा करणे आणि सिग्नल तोडणे ही अपघाताची प्रमुख कारणे असली, तरी रस्त्यावरील खड्डे आणि अशास्त्रीय गतिरोधक हेदेखील अपघातास कारणीभूत ठरत आहेत. तसेच वाहन चालविताना स्टंट करणे, वेगात वाहन चालविण्याची स्पर्धा लावणे, ट्रिपल सीट जाणे, सिग्नल तोडणे आदी प्रकारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून नियमांचा भंग केला जातो. या विद्यार्थ्यांकडे अत्याधुनिक दुचाकी असल्याने ते कधीच पोलिसांच्या हाती लागत नाहीत. शहराच्या मुख्य चौकाचौकांत वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहेत.