रावेत बीआरटी मार्गावर भीषण अपघात; भरधाव चारचाकीने दोन दुचाकींना उडवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 14:21 IST2021-10-14T14:13:31+5:302021-10-14T14:21:19+5:30
पिंपरी: भरधाव चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. त्यानंतर चारचाकी दुभाजकावर चढली. यात दुचाकीवरील दोन जण जखमी झाले. ...

रावेत बीआरटी मार्गावर भीषण अपघात; भरधाव चारचाकीने दोन दुचाकींना उडवले
पिंपरी: भरधाव चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. त्यानंतर चारचाकी दुभाजकावर चढली. यात दुचाकीवरील दोन जण जखमी झाले. निगडी प्राधिकरण येथे भक्ती शक्ती चौक ते रावेत बीआरटी मार्गावर बुधवारी (दि. १३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
रावेतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आकुर्डी रेल्वे स्थानकाकडून बीआरटी मार्गे भक्ती शक्ती चौकाच्या दिशेने चारचाकी वाहन भरधाव जात होते. त्यावेळी चारचाकीने दोन दुचाकींना धडक दिली. यातील एका दुचाकीवर दोन जण होते. त्यातील पाठीमागे बसलेला दुचाकीस्वार जखमी झाला. तसेच अन्य एका दुचाकीवरील एक जण, असे दोघे या अपघातात जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान दुचाकींना धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन बीआरटी मार्गातील दुभाजकावर चढली. अपघाताबाबत माहिती मिळताच निगडी व रावेतचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चारचाकी वाहनाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चारचाकी वाहनात चार मुले असल्याचेही समोर आले आहे. वाहनचालक तसेच अपघातातील जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.