अबब..! वर्षभरात ६५ कोटींचा दंड थकीत; बेशिस्त वाहनचालकांचा ‘टाॅप गिअर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:32 IST2025-01-15T11:31:52+5:302025-01-15T11:32:52+5:30

- दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिस ‘ॲक्शन मोड’वर

Abb! Fines of Rs 65 crores due in a year; 'Top Gear' of undisciplined drivers | अबब..! वर्षभरात ६५ कोटींचा दंड थकीत; बेशिस्त वाहनचालकांचा ‘टाॅप गिअर’

अबब..! वर्षभरात ६५ कोटींचा दंड थकीत; बेशिस्त वाहनचालकांचा ‘टाॅप गिअर’

पिंपरी : शहरात दिवसेंदिवस बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढत आहे. त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन हाेत आहे. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून नियमित कारवाई सुरू आहे. यात २०२४ या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी ६,४२,१४१ केसेस करून ७४ कोटी ६७ लाख ४३ हजार ६५० रुपयांचा दंड आकारला. त्यातील ९ कोटी ४९ लाख २१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर ६५ कोटी १८ लाख २२ हजार ३५० रुपयांचा दंड थकीत आहे. दंड थकवणारे पोलिसांच्या रडारवर असून, दंड वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त आहेत. असे असले, तरी बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. काही वाहनचालक विना हेल्मेट, विना सिटबेल्ट, नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल सिट, कर्णकर्कश हाॅर्न वाजवणे, सायलेन्सर बदलून वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य चौक, सिग्नल तसेच महामार्गांवरदेखील कारवाई करण्यात आली.

कारवाई करूनही नियमांचे उल्लंघन
बेशिस्त वाहनचालकांवर नियमित कारवाई करण्यात येत आहे. असे असले, तरी वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार सुरूच आहेत. ट्रिपल सिट, विनाहेल्मेट, विनासिटबेल्ट, सिग्नल जम्पिंग, राँग साइड, मोबाइलवर बोलणे, काळी काच, नो पार्किंगमध्ये पार्किंग करणे, बीआरटी मार्गातून वाहन दामटणे, अशा विविध प्रकरणांमध्ये वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

दंड न भरल्यास खटला, नोटीस
दंड थकित असल्यास संबंधित वाहन पुन्हा कारवाईत पकडल्यास दंड वसूल केला जातो. तसेच, न्यायालयात खटला दाखल होऊ शकतो. या अगोदर ज्या वाहनधारकांकडे ई-चलान थकीत आहे, अशा वाहनधारकांना लोकअदालतीत सहभागी होण्यासाठी व दंड भरण्यासाठी नोटीस पाठविण्यात येते.

चौकांमध्ये दंडवसुली
थकीत दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहन तपासणी होणार आहे. दंड थकवल्याचे समोर आल्यास संबंधित वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल. हे टाळण्यासाठी संबंधित वाहनधारकांनी दंड भरून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेंतर्गत २०२४ या वर्षभरात केलेली कारवाई

एकूण केसेस - एकूण दंड - पेड केसेस - पेड दंड - अनपेड केसेस - अनपेड दंड

६,४२,१४१ - ७४,६७,४३,६५० - १,०४,२८६ - ९४,९,२१३०० - ५,३०,४७६ - ६५,१,८२,२३५० 
 

वाहनांवरील थकीत दंड वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वाहनधारकांनी दंड भरून सहकार्य करावे. वाहतूक नियमांचे पालन करावे. जेणे करून कारवाईला सामोरे जावे लागणार नाही. - बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

Web Title: Abb! Fines of Rs 65 crores due in a year; 'Top Gear' of undisciplined drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.