लग्नाचे वचन एकीला, साखरपुडा दुसरीशी; तरुणीने प्यायले विषारी औषध
By रोशन मोरे | Updated: October 18, 2022 17:57 IST2022-10-18T17:51:55+5:302022-10-18T17:57:16+5:30
फसवणूक करणाऱ्या तरुणासह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल

लग्नाचे वचन एकीला, साखरपुडा दुसरीशी; तरुणीने प्यायले विषारी औषध
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. मात्र, तरुणाने साखरपुडा दुसऱ्याच मुलीसोबत केला. त्यामुळे एका तरुणीने उंदीर मारण्याचे विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाचे आमिषाने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रकार मागील आठ ते दहा महिन्यांपासून सुरू होता. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार फसवणूक करणाऱ्या तरुणासह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीची ओळख आरोपीसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. आरोपीने फिर्यादीच्या बहिणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मात्र, दुसऱ्या तरुणीसोबत साखरपुडा करून फसवणूक केली.
तसेच फिर्यादीच्या आई- वडिलांचा शिवीगाळ करत अपमान केला. त्यामुळे फिर्यादीच्या बहिणीने उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे.