चिंचवडमधील ‘त्या’ अपघातप्रकरणी अल्पवयीन दुचाकीचालकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 15:10 IST2023-12-08T15:09:34+5:302023-12-08T15:10:23+5:30

याप्रकरणी तीन महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला....

A case has been filed against a minor two-wheeler driver in the case of 'that' accident in Chinchwad | चिंचवडमधील ‘त्या’ अपघातप्रकरणी अल्पवयीन दुचाकीचालकावर गुन्हा

चिंचवडमधील ‘त्या’ अपघातप्रकरणी अल्पवयीन दुचाकीचालकावर गुन्हा

पिंपरी : सतरा वर्षीय मुलगा चालवत असलेल्या भरधाव स्पोर्ट्स बाइकवरील नियंत्रण सुटून दुचाकी झाडावर आदळून दुचाकीचालक मुलासह त्याच्या मागे बसलेल्या १३ वर्षीय मित्राचाही मृत्यू झाला होता. चिंचवड येथील शाहूनगर येथे २५ ऑगस्ट रोजी हा अपघात झाला होता. याप्रकरणी तीन महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

सचिन कैलासचंद लोहाडे (४५, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून दुचाकी चालवणाऱ्या १७ वर्षीय मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोहाडे यांचा १३ वर्षीय मुलगा १७ वर्षीय मुलासह त्याच्या दुचाकीवरून जात होता. १७ वर्षीय मुलाकडे कोणताही वाहन परवाना नसताना तो स्पोर्ट्स बाइक चालवत होता. यावेळी भरधाव असल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी थेट झाडावर आदळली. यात दुचाकीचालक १७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी लोहाडे यांचा १३ वर्षीय मुलगा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.

Web Title: A case has been filed against a minor two-wheeler driver in the case of 'that' accident in Chinchwad