निर्बीजीकरणावर ८३ लाखांचा खर्च, तरी वाढली मोकाट कुत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:50 IST2025-01-17T10:50:10+5:302025-01-17T10:50:20+5:30

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक त्रस्त; रात्रपाळी करणाऱ्यांचे जगणे मुश्कील

83 lakhs spent on desexing, but the number of stray dogs increased | निर्बीजीकरणावर ८३ लाखांचा खर्च, तरी वाढली मोकाट कुत्री

निर्बीजीकरणावर ८३ लाखांचा खर्च, तरी वाढली मोकाट कुत्री

पिंपरी : निगडी प्राधिकरण, आकुर्डीसह पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये भटक्या श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. लहान मुले, ज्येठ नागरिकांवर ते हल्ले करत असून यामुळे जीव धोक्यात आला आहे. पशुवैद्यकीय विभागामार्फत निविदा काढून मोकाट श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येते. महापालिकेने आतापर्यंत ८३ लाख एक हजार ६०० रुपये खर्च केला, तरीही मोकाट श्वानांची संख्या वाढत आहे.

निगडी प्राधिकरण, आकुर्डी, मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर, विद्यानगर, परशुराम, आनंदनगर, इंदिरानगर आदी परिसरात मोकाट श्वानांचा वावर वाढल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून महापालिकेला येत आहेत. पिसाळलेल्या श्वानांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे अशा श्वानांना पकडून महापालिका प्रशासनाने बंदिस्त करावे, अशी मागणी होत आहे.

निर्बीजीकरणावर ८३ लाखांचा खर्च?

महापालिकेच्या वतीने वर्षानुवर्षे पशुवैद्यकीय विभागामार्फत निविदा काढून मोकाट श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येते. या कामाचा स्वतंत्र ठेकेदार नियुक्त केला जातो. शहरात जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ अखेर एका वर्षात ९४ मुले आणि ३५८ मोठ्या व्यक्तींना श्वानांनी चावा घेतला आहे. २०११ मध्ये महापालिकेने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया मोहीम सुरू केली. कुत्र्यांना पकडून महापालिकेच्या नेहरूनगर केंद्रात आणले जाते. शस्त्रक्रिया करून रेबीजची लस देण्यात येत होती. त्यानंतर तीन दिवसांत कुत्र्याला मूळ भागात सोडले जाते. २०२३ मध्ये ७,३०० श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली आहे. एका कुत्र्यासाठी ९९९ रुपये खर्च येतो. त्यानुसार सरासरी ८३ लाख एक हजार ६०० रुपये खर्च महापालिकेने केला आहे.

 भटक्या श्वानांसाठी महापालिका काय करते?

- दीड वर्षात आठ हजार श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया

- श्वान पकडण्यासाठी ठेकेदार नेमण्यासाठी टेंडर नाही

- पीपल फॉर ॲनिमल संस्थेचे काम बंद केले

- सध्या महापालिका स्वतः उपचार करते

- दिवसाला सरासरी २० जखमी श्वानांवर उपचार

- श्वान पकडण्यासाठी चार डॉग व्हॅन आहेत

- उपचारांसाठी एक ॲम्बुलन्स आहे

- मानधनावरील पाच डॉक्टर काम पाहात आहेत

- दिवसाला १८ श्वानांवर शस्त्रक्रिया

- श्वान पकडण्यासाठी आहेत १३२ पिंजरे

मागील पाच वर्षांतील श्वानांच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रियेची संख्या

वर्ष - शस्त्रक्रिया

२०२०-२१ - २५,१२७

२०२१-२२ - १२,६९७

२०२२-२३ - २,४०५

२०२३-२४ - ३,५९८

२०२४-२०२५ - ७,३००
 

शहरात मोकाट श्वानांनी उच्छाद मांडला असून महापालिकेने यांना वेळीच बंदिस्त करणे गरजेचे आहे, भटक्या श्वानांनी चावा घेतल्यामुळे रेबीजसारख्या आजारांची लागण होऊ शकते. अनेक वेळा ते अंगावर येत असल्यामुळे लहान बालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या नागरिकाला प्राणास मुकावे लागले, तर याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची असेल. - मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते

कायद्याने श्वानकडून त्याला मारून टाकणे गुन्हा आहे. त्यामुळे भटके श्वान पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते. एका श्वानावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्यानंतर चार दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येते. त्यांच्या मूळ अधिवासात सोडले जाते. - संदीप खोत, उपायुक्त, महापालिका

Web Title: 83 lakhs spent on desexing, but the number of stray dogs increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.