लग्न जुळवण्यासाठी ८० फुटांवर; अग्निशामक दलाच्या जवानांची उडाली धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 06:53 IST2018-12-10T02:52:31+5:302018-12-10T06:53:44+5:30
रावेतजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मोठ्या क्रेन लावल्या असून, त्या क्रेनवर दुपारी बाराच्या सुमारास एक गृहस्थ चढून ८० फूट उंचीवर गेला.

लग्न जुळवण्यासाठी ८० फुटांवर; अग्निशामक दलाच्या जवानांची उडाली धावपळ
पिंपरी : रावेतजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मोठ्या क्रेन लावल्या असून, त्या क्रेनवर दुपारी बाराच्या सुमारास एक गृहस्थ चढून ८० फूट उंचीवर गेला. वर जाऊन लोकांचे लक्ष वेधण्यासाठी तो आवाज देऊ लागला. आत्महत्या करण्यासाठी तो गेला असावा, असा समज झाल्याने पोलीस, अग्निशामक दल यांची अक्षरश: तारांबळ उडाली. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांना तो म्हणाला, ‘‘मी आत्महत्या करण्यासाठी नव्हे, तर मनातील भावना व्यक्त करण्यासाठी उंचीवर गेलो होतो. माझे लग्न जुळवून द्यावे, एवढीच विनंती आहे.’’ असे म्हणणारा हा गृहस्थ एचआयव्हीग्रस्त असून, मानसिक रुग्ण आहे.
मूळचा मराठवाड्यातील, परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये नातेवाइकांकडे आलेला हा ३९ वर्षांचा गृहस्थ मानसिक रुग्ण झाला आहे. वयाच्या २०व्या वर्षी त्याला एचआयव्ही लागण झाली. एचआयव्हीग्रस्त आहे, हे लक्षात आल्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी त्याच्यापासून दूर जाऊ लागली. तो एकटा पडला. कोणाबरोबर मिसळता येत नाही. कोणी आपल्या भावना जाणून घेत नाही. त्यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.
मानसिक रुग्ण झाल्याने रविवारी दुपारी तो उड्डाणपुलाच्या कामासाठी लावलेल्या क्रेनवर गेला. ८० फूट उंच क्रेनवर जाऊन मोठमोठ्याने ओरडू लागला. कोणीतरी प्रेमवीर असावा, असे वाटल्याने तेथे बघ्यांची गर्दी झाली. तो आत्महत्येसाठी गेला असावा, या भीतीने नागरिकांनी देहूरोड पोलिसांना, तसेच अग्निशामक दलाला कळविले. अग्निशामक दलाचे जवान तेथे हजर झाले. त्यांनाही तो कशासाठी गेला आहे हे समजेना? अग्निशामक दलाच्या जवानांपैकी एकजण त्याच्याशी बोलत बोलत क्रेनवर गेला. त्याला खाली उतरण्याची विनंती केली. माझे लग्न जुळवून देणार असाल, तरच खाली येतो, असे म्हणू लागला.