पिंपरी : पिंपरी ते दापोडी दरम्यान सुरु असलेल्या महामेट्रोचे काम सुरू आहे. या कामाचे ६५ हजारांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. वल्लभनगर येथे दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सोमनाथ नागनाथ गायकवाड (वय ३८, रा. थेरगाव) यांनी मंगळवारी (दि. १०) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी गायकवाड हे इनवायर इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करतात. चोरट्यांनी महामेट्रोच्या साइटवरून २५ हजार रुपये किंमतीच्या २५ स्टील स्ट्रक्चरच्या प्लेटस्, ४० हजार रुपये किंमतीचे ४० लोखंडी चॅनल असा एकूण ६५ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. गायकवाड यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. या अर्जावरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव तपास करीत आहेत.
पिंपरीतून महामेट्रोचे ६५ हजारांचे साहित्य चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 20:11 IST