पिंपरी : म्हाडाचे फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने शेकडो जणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी अटक केलेल्या संशयिताला २९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याला बुधवारी (दि. २९) पुन्हा न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात ६०० पेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
प्रतिक राजेश धाईंजे (रा. दिघी रोड, भोसरी), असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रतिक हा म्हाडाचे घर मिळवून देतो, असे लोकांना सांगायचा. त्यासाठी म्हाडाचे बनावट लेटरहेड तयार करून तसेच म्हाडाच्या लॉटरी आणि इतर माहितीबाबत लेखी पत्र देऊन त्याने शेकडो नागरिकांची २२ लाख ४१ हजार ७६० रुपयांची फसवणूक केली.
दरम्यान, म्हाडाचे घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक होत असल्याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी प्रतिक धाईंजे याला अटक केली.
आपल्याला हक्काचे घर मिळणार म्हणून शेकडो लोकांनी प्रतिककडे पैसे दिले. तसेच घर लागल्यानंतर आणखी पैसे देण्याचे कबूल केले. त्याने म्हाडाच्या बनावट लेटरहेडवर घर लागल्याचे लिहून दिले.
प्रतिक याने म्हाडाचे घर देण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याचे कबूल केले. त्याने फसवणूक केलेल्या लोकांची यादी वाढत आहे. तसेच प्रतिक याला या फसवणूक प्रकरणात मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. यासह इतर तपासासाठी प्रतिक याची पोलिस कोठडी वाढवून मिळण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
फसवणूक झालेल्या ७५ जणांची पोलिसांकडे धाव
प्रतिक याने फसवणूक केलेल्यांपैकी ७५ नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणातील फसवणुकीच्या रकमेचा आकडा तसेच फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे यांनी व्यक्त केला.