५ मार्चपर्यंत कर न भरल्यास लिलाव; जप्त केलेल्या मालमत्ताधारकांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 15:24 IST2025-03-01T15:24:04+5:302025-03-01T15:24:58+5:30
थकबाकीदारांना बिल भरण्यासाठी ५ मार्चपर्यंत अंतिम मुदत दिली आहे.

५ मार्चपर्यंत कर न भरल्यास लिलाव; जप्त केलेल्या मालमत्ताधारकांना इशारा
पिंपरी : महापालिकेच्या कर संकलन विभागाने ४३८ मालमत्तांचा लिलाव जाहीर केला आहे. त्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत होती. मुदतीमध्ये ३६ जणांनी पूर्ण, तर ३६ जणांनी बिलाची काही रक्कम भरली आहे. बिल भरण्याची मुदत वाढवून ५ मार्च करण्यात आली आहे. ही थकबाकीदारांना अखेरची मुदत असेल. त्या मुदतीमध्ये थकबाकी न भरल्यास लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्तअविनाश शिंदे यांनी दिली.
कर संकलन विभागाकडून जप्ती मोहीम डिसेंबर २०२४ पासून तीव्र करण्यात आली. त्यात ८७७ मालमत्ता सील करून जप्त करण्यात आल्या. त्यात बिगरनिवासी, व्यावसायिक व मिश्र अशा मालमत्तांचा समावेश आहे. १० फेब्रुवारीपर्यंत जप्त केलेल्या ७५९ मालमत्तांपैकी ३२१ मालमत्ताधारकांनी थकबाकी जमा केल्याने मालमत्ता मालकाच्या ताब्यात देण्यात आल्या.
थकबाकीदार ४३८ मालमत्ताधारकांची यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती. त्यांना २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत थकीत कर भरण्याची संधी दिली होती. ३६ मालमत्ताधारकांनी काही प्रमाणात भरणा केला आहे. उर्वरित मालमत्तांची लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. थकबाकीदारांना बिल भरण्यासाठी ५ मार्चपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. जे कराचा भरणा करणार नाहीत, अशा मालमत्ता करावर अधिकचा १५ टक्के लिलाव खर्च लावण्यात येणार आहे. त्यामुळे बिल भरावे, अन्यथा त्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मालमत्ताधारकांना लिलावातून वाचवण्यासाठी अत्यंत मर्यादित संधी असणार आहे. करभरणा न केलेल्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशा मालमत्ताधारकांनी ५ मार्चपूर्वी थकबाकी भरून लिलाव टाळावा. - प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त