भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू ; चिंचवडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 10:14 IST2019-12-22T10:13:11+5:302019-12-22T10:14:52+5:30
चाराचाकी वाहनाच्या धडकेत दीड वर्षाच्या बालकाच्या मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू ; चिंचवडमधील घटना
पिंपरी : इतर मुलांसह खेळत असलेल्या दीड वर्षांच्या चिमुरड्याला भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर चारचाकी वाहनाचा चालक अपघातस्थळी न थांबता वाहन घेऊन पळून गेला. चिंचवड येथे शुक्रवारी (दि. 20) रात्री पावणेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व महादेव गोपरेड्डी असे मृत्यू झालेल्या दीड वर्षांच्या चिमुरड्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई अश्विनी महादेव गोपरेड्डी (वय 25, रा. गगनगिरी मठाजवळ, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास अथर्व इतर मुलांसोबत खेळत होता. त्यावेळी आरोपीने त्याचे चारचाकी वाहन भरधाव वेगात चालवून वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले. या वाहनाची अथर्व याला धडक बसली. यात त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी वाहनासह पळून गेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.