12 lakh 30 thousand gutka seized on Mumbai-Pune expressway; Social Security Squad action | मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर १२ लाख ३० हजारांचा गुटखा जप्त; सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर १२ लाख ३० हजारांचा गुटखा जप्त; सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

पिंपरी : मुंबई येथून हडपसर येथे गुटखा घेऊन जात असलेले चारचाकी वाहन पोलिसांनी सापळा रचून पकडले. या कारवाईत १२ लाख ३० हजार ५६० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. मुंबई -पुणे द्रुतगती मार्गाच्या सोमाटणे फाटा येथील सब-वेवर मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

होशीयतअली शेख (वय २९, रा. भिवंडी, ठाणे) व इतर एक इसम यांच्या विरोधात शिरगाव पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मुंबई येथून एका चारचाकी वाहनातून हडपसर येथे गुटखा वाहतूक करून घेऊन जात आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून आरोपी व चारचाकी वाहनाला पकडले. यात १२ लाख ३० हजार ५६० रुपये किमतीचा गुटखा, तीन हजार ३०० रुपये रोख, ५०० रुपये किमतीचा मोबाईल फोन, आठ लाख २० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन, असा एकूण २० लाख ५४ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, पोलीस कर्मचारी विजय कांबळे, सुनील शिरसाट, संतोष बर्गे, नितीन लोंढे, भगवंता मोठे, मारुती करचुंडे, अनिल महाजन, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: 12 lakh 30 thousand gutka seized on Mumbai-Pune expressway; Social Security Squad action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.