तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात २.११ कोटींची फसवणूक करणाऱ्या ११ जणांना अटक

By नारायण बडगुजर | Updated: June 18, 2025 18:59 IST2025-06-18T18:57:32+5:302025-06-18T18:59:33+5:30

डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून एकाला ५२ लाख ५९ हजार रुपयांना फसवल्याची घटना उघडकीस आली

11 people arrested for cheating Rs 2.11 crore in three different cases | तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात २.११ कोटींची फसवणूक करणाऱ्या ११ जणांना अटक

तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात २.११ कोटींची फसवणूक करणाऱ्या ११ जणांना अटक

पिंपरी : डिजिटल अरेस्ट, शेअर बाजारात गुंतवणूक आणि डेटिंग ॲपवर लग्नाचे आमिष दाखवून तीन गुन्ह्यांत २.११ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी ११ संशयितांना दादरा नगर हवेली, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे विमानतळ येथून अटक केली.

गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक, चौघांना अटक

पिंपरी-चिंचवडमधील एकाला शेअर मार्केटमध्ये आयपीओ खरेदीमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल, असे आमिष दाखवून ३.३० लाख रुपयांची फसवणूक झाली होती. यातील २.१० लाख रुपये सिल्वासा, दादरा व नगर हवेली येथील बँक खात्यावर गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दादरा व नगर हवेली येथून सलमान रफिक खान (३२), बंटी रमेशभाई पांचाळ (३०), इंतकाफ इद्रीस खान (३६), सुरज कृष्णा सिंग (३४, दादरा व नगर हवेली) यांना अटक केली.

दीड कोटींची फसवणूक करून नेपाळला पळालेल्या तिघांना अटक

डेटिंग ॲपवर लग्नाचे आमिष दाखवून महिलेकडून एक कोटी ५५ लाख रुपये घेण्यात आले. पैसे घेण्यासाठी संशयितांनी घर खरेदी, ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक अशी कारणे सांगितली. पोलिसांनी सोलापूर येथे जाऊन अमित अशोक एकबोटे याच्याकडे चौकशी केली. त्याचे बँक खाते गेमिंगसाठी वापरले जाणार असल्याचे सांगणाऱ्या शुभम चंद्रकांत मंथा (२५), स्वप्नील चंदुलाल बाहेती (३५), प्रशिक उत्तम नवघरे (२६, सोलापूर) यांना अटक केली. हे तिघे पाटणामार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांना अटक केली. संशयित स्वप्नील आणि शुभम हे चीन येथील सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात आहेत.

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ५२.५९ लाखांची फसवणूक

डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून एकाला ५२ लाख ५९ हजार रुपयांना फसवल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी सुरुवातीला दोघांना अहिल्यानगर येथून अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता संशयित विशाल पालवे लोकांकडून बँक खात्याचे डिटेल्स घेऊन त्यावर फसवणुकीतील पैसे घेत होता. ते पैसे क्रिप्टो वॉलेटला युएसडीटीमध्ये रूपांतरण करून घेत होता. पोलिसांनी त्याला अटक केली. नऊ मोबाईल फोन, २३ बँक खात्याचे पासबुक, १८ बँक खात्यांचे चेकबुक, ३५ डेबिट कार्ड, ६४०० रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्यासह अक्षय सदाशिव गळवे आणि मयूर सुनील आणेचा यांनाही अटक करण्यात आली.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: 11 people arrested for cheating Rs 2.11 crore in three different cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.