मेट्रोसाठी शंभर टक्के जागा उपलब्ध; माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प
By नारायण बडगुजर | Updated: March 6, 2025 18:43 IST2025-03-06T18:43:05+5:302025-03-06T18:43:41+5:30
प्राधिकरणाने आवश्यक जागा मेट्रो सवलतकार कंपनीस उपलब्ध करून दिली आहे.

मेट्रोसाठी शंभर टक्के जागा उपलब्ध; माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ हा २३.२०३ किलोमीटरचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्राधिकरणामार्फत एकूण आवश्यक जागांपैकी ९९.९४ टक्के जागा मेट्रो सवलतकार कंपनीस उपलब्ध करून दिली आहे. आजघडीला मेट्रो प्रकल्पाचे काम ८३ टक्के पूर्ण झाले आहे.
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो या प्रकल्पाची अंमलबजावणी पीपीपी तत्वावर करण्यास शासनाने ९ फेब्रुवारी २०१८ रोजी मान्यता दिलेली आहे. मेट्रो लाईन-३ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरणाने शासनाच्या मान्यतेने मेट्रो सवलतकार कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. यांच्यासोबत सवलत करारनामा केला आहे. त्यानुसार मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व जागा मेट्रो प्रकल्प बांधकामासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राधिकरणाने आवश्यक जागा मेट्रो सवलतकार कंपनीस उपलब्ध करून दिली आहे.
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ मेट्रो प्रकल्पासाठी राजभवन, पुणे आवारातील पुणे विद्यापीठ बाजूकडील २६३.७८ चौरस मीटर जागा जिना बांधकामासाठी आवश्यक होती. संबंधित जागा हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणामार्फत राजभवन कार्यालयास नोव्हेंबर २०२२ मध्ये सादर केला होता. त्यानुसार मेट्रो जिन्यासाठी आवश्यक असलेली २६३.७८ चौरस मीटर जागा हस्तांतर करण्यास राजभवन कार्यालयाने मान्यता दिली आहे. यामुळे मेट्रो प्रकल्पास आवश्यक असलेली १०० टक्के जागा प्राधिकरणाच्या ताब्यात आली आहे.