मुखी रामाचा जप, १४०० किमी पायी यात्रा; मुंबईची मुस्लीम युवती अयोध्येला पोहचली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 20:42 IST2024-01-21T20:22:14+5:302024-01-21T20:42:04+5:30

२२ जानेवारीला अयोध्येत श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक आणि अविस्मरणीय क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी प्रत्येक राम भक्त उत्सुक आहे. या भक्ताला कोणत्याही मार्गाने अयोध्येला पोहोचायचे आहे आणि हा सुंदर क्षण त्याच्या डोळ्यात कैद करायचा आहे. त्यात एका मुस्लीम युवतीचाही सहभाग आहे.

अशीच एक मुस्लीम राम भक्त २० वर्षीय शबनम शेख असून ती मुंबईहून पायी बांदा येथे आली. चेहऱ्यावर हिजाब घालून आणि तोंडी जय श्री राम म्हणत शबनम अयोध्येकडे पोहचेल. या मुस्लीम युवतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सनातनी मुस्लीम असल्याचा दावा करणारी २० वर्षीय शबनम शेख हिने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशच्या सीमेत महोबा येथून प्रवेश केला. ती शनिवारी सायंकाळी बांदा येथील भुरागडमार्गे मातौंध पोलीस ठाणे हद्दीतून बांदा शहरात आली. बांदा हद्दीत येताच मातौंध पोलिस ठाण्याचे स्टेशन प्रभारी राम दिनेश तिवारी आणि पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवून बांदा शहराच्या सीमेपर्यंत सोडले.

शहरात पोहोचताच शबनमने येथील प्रसिद्ध संकट मोचन मंदिरात हनुमानजींचे दर्शन घेतले.बांदा येथे शबनमच्या आगमनाची बातमी समजताच अनेक हिंदू संघटनांनी मंदिरात पोहोचून तिचे जल्लोषात स्वागत केले. तिला रामभक्ताचे उपरणं घातले आणि कपाळाला तिलक लावला. स्वत:ची ओळख करून देताना तिने सर्वांना जय श्री रामही म्हटले. त्यावर हिंदू संघटनांनी तिचे स्वागत करून तिच्यासोबत पायी यात्रेत सहभागी झाले.

२० वर्षीय शबनम म्हणाली की, 'माझी लहानपणापासूनच रामावर श्रद्धा आहे. मी अजान तसेच भजनेही ऐकली आहेत. मी अयोध्येत श्री रामलला यांच्या दर्शनासाठी १४०० किलोमीटर पायी प्रवास करण्याचा संकल्प केला होता. आज ३१ व्या दिवशी मी बांदा येथे पोहोचले. राम सर्वांचा आहे, राम सर्वांमध्ये आहे हा संदेश मला सर्वांना द्यायचा आहे.

अयोध्येला पोहोचण्याच्या या भक्तीच्या धुंदीत शबनमच्या पायाला फोड आले, तरीही तिच्या आस्थेसमोर तिला या वेदनाही होत नाहीत. रविवारी तिने पुढील प्रवास सुरू केला. वाटेत ठिकठिकाणी हिंदू संघटनांनी त्यांचे स्वागत केले. ते रविवारी तिंदवारी मार्गे फतेहपूर हद्दीत प्रवेश करेल आणि सोमवारी सकाळी ती अयोध्येत पोहचेल.

कडाक्याच्या थंडीत पायी प्रवास करताना शबनम शेख हिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण संकल्प पूर्ण करायचाच ही जिद्द तिने मनाशी ठरवलं आहे. शबनमला तिच्या मैत्रिणींसह प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होऊन तिच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. प्रवासादरम्यानच्या सर्व त्रासांमध्येही शबनमच्या चेहऱ्यावर थकवा किंवा निराशा दिसत नव्हती.

राम नाम आणि राम भजन गाऊन शबनम तिचा प्रवास सुकर करत आहे. हिजाब परिधान केलेल्या शबनमच्या हातात रामाचा झेंडा आहे. तिच्यासोबत तिचे काही मित्रही आहेत. दीड हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करून ती अयोध्येला जाणार आहे.

शबनम सांगते की, मी मुंबईत राहते. या शहरात एकमेकांवर प्रेम आणि बंधुभाव इतका आहे की लोक एकमेकांचे सण पारंपारिक पद्धतीने साजरे करत आहेत. मी लहानपणापासून प्रभू रामाला मानते, त्यांच्यावर माझे प्रेम आणि भक्ती आहे. त्यामुळे मला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचे आहे.

अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून लोक अयोध्या शहरात दाखल होत आहेत. त्यात विविध धर्मांच्या लोकांचा समावेश आहे.कोणी शेकडो किमी सायकल प्रवास करून, कोणी स्केटिंग करत व सामाजिक जागृतीचा संदेश देत अयोध्येत दाखल होणार आहेत.

















