Travel : लक्षद्वीपमध्ये मिळेल मालदीवसारखा आनंद; जाणून घ्या बजेट आणि फिरण्याची सर्वोत्तम वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:52 IST2026-03-23T13:44:28+5:302026-03-23T13:52:48+5:30
जर तुम्हाला मालदीवसारखाच निळाशार समुद्र आणि पांढरी शुभ्र वाळू अनुभवायची असेल, तर आता परदेशात जाण्याची गरज नाही.

अनेकदा सुट्ट्यांचे नियोजन करताना पर्यटकांच्या मनात सर्वात आधी मालदीव किंवा इतर परदेशी समुद्रकिनाऱ्यांचे नाव येते. पण, जर तुम्हाला मालदीवसारखाच निळाशार समुद्र आणि पांढरी शुभ्र वाळू अनुभवायची असेल, तर आता परदेशात जाण्याची गरज नाही.

भारताचे 'लक्षद्वीप' हे पर्यटन स्थळ सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही परदेशी बेटापेक्षा कमी नाही. कमी बजेटमध्ये निसर्गाचा अविस्मरणीय अनुभव देणारे लक्षद्वीप सध्या पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र, लक्षद्वीपला जाण्यापूर्वी काही विशेष नियमांची आणि नियोजनाची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

लक्षद्वीप हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून निसर्ग संवर्धनाचे उत्तम उदाहरण आहे. येथे पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आहेत, ज्यामुळे येथील शांतता आणि स्वच्छता टिकून आहे. येथील कमी गर्दीचे समुद्रकिनारे आणि स्वच्छ पाणी मनाला भुरळ घालते. स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग, कयाकिंग आणि ग्लास-बॉटम बोट राईडसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील समुद्री जीवसृष्टी आणि प्रवाळ अतिशय सुंदर पद्धतीने संरक्षित करण्यात आले आहेत.

समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी हवामान पोषक असणे गरजेचे आहे. ऑक्टोबर ते मार्च हा लक्षद्वीपला भेट देण्यासाठी सर्वात योग्य काळ आहे. या काळात हवामान आल्हाददायक असते आणि समुद्रही शांत असतो. वॉटर स्पोर्ट्ससाठी हीच परफेक्ट वेळ आहे.

एप्रिल आणि मे या महिन्यात थोडी उष्णता जाणवते. ज्यांना गर्दी आवडत नाही आणि शांतता हवी आहे, ते या काळात जाऊ शकतात. मात्र, जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा काळ आहे. मुसळधार पावसामुळे जहाजांची वाहतूक आणि वॉटर स्पोर्ट्स बंद असतात. त्यामुळे या काळात जाणे टाळावे.

लक्षद्वीपला जाण्यासाठी तुमच्याकडे दोन मुख्य पर्याय आहेत. कोच्चीवरून तुम्ही लक्षद्वीपच्या 'अगत्ती' विमानतळासाठी फ्लाईट घेऊ शकता. विमान प्रवासाचे येण्या-जाण्याचे भाडे साधारणपणे १५,००० ते २५,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते (वेळेनुसार बदलू शकते).

कोच्चीवरून प्रवासी जहाजे देखील उपलब्ध आहेत. या प्रवासाला १४ ते २० तास लागतात. एका बाजूचे तिकीट साधारणपणे २,५०० ते ५,००० रुपयांपर्यंत असते. लक्षद्वीपला जाण्यासाठी सरकारकडून 'परमिट' घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रवासाच्या काही दिवस आधीच या कागदपत्रांची पूर्तता करा.

















