Travel : स्वस्तात परदेशवारी! अवघ्या २५ हजारात फिरून या 'रावणाची लंका'; पाहा काय खावे आणि कुठे फिरावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 17:25 IST2026-02-16T17:11:39+5:302026-02-16T17:25:13+5:30

Australia Travel : सुट्ट्यांच्या नियोजनासाठी श्रीलंकेला जाणार असाल, तर ही माहिती तुमच्यासाठीच..

निळाशार समुद्र, ऐतिहासिक वास्तू आणि जिभेवर रेंगाळणारी चविष्ट खाद्यसंस्कृती... ही ओळख आहे श्रीलंकेची राजधानी कोलंबोची! सुट्ट्यांच्या नियोजनासाठी कोलंबोला जाणार असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरेल. हिंद महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या या शहरात बजेटमध्ये राहून 'रॉयल' अनुभव घेता येतो.

गंगारामया मंदिर : हे केवळ मंदिर नसून एक सांस्कृतिक केंद्र आहे. बेइरा तलावाच्या मध्यभागी असलेले हे बुद्ध मंदिर तुम्हाला मनाला शांतता देईल. येथे प्राचीन ग्रंथ, बुद्ध मूर्ती आणि एक भव्य संग्रहालय पाहायला मिळते.

गॉल फेस ग्रीन: जर तुम्हाला समुद्राच्या लाटा आणि मावळता सूर्य पाहायला आवडत असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे. संध्याकाळी येथे फिरणे आणि समुद्राच्या हवेसोबत स्ट्रीट फूडचा आनंद घेणे, हा एक वेगळाच अनुभव असतो.

नॅशनल म्युझियम ऑफ कोलंबो: ज्यांना इतिहास आणि संस्कृतीची आवड आहे, त्यांनी येथे नक्की जावे. श्रीलंकेच्या राजांची वैभवशाली गाथा आणि प्राचीन संस्कृती येथे जिवंत होते.

लाल मशीद : 'जामुल-अलफर मशीद' ही कोलंबोची खरी ओळख आहे. लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांनी सजलेली ही वास्तू एखाद्या कॅन्डीसारखी दिसते, जी पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे.

पेट्टा मार्केट: शॉपिंग प्रेमींसाठी हे नंदनवन आहे. कापड, मसाले, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू येथे अतिशय स्वस्त दरात मिळतात.

श्रीलंका खाद्यप्रेमींसाठी स्वर्ग आहे. राईस आणि करी हा श्रीलंकेचा सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे. नारळाच्या दुधाचा वापर करून बनवलेली ही करी गरम भातासोबत सर्व्ह केली जाते. तांदळाच्या पिठापासून बनवलेली वाटीच्या आकाराची 'हॉपर्स' ही डिश नाश्त्यासाठी सर्वोत्तम आहे. हे पदार्थ गोड आणि तिखट अशा दोन्ही प्रकारात मिळतात.

जर तुम्हाला तव्यावर चपळाईने बनवला जाणारा पदार्थ पाहायचा असेल, तर कोट्टू रोटी नक्की मागवा. रोटीचे तुकडे, भाज्या, अंडी आणि मसाले यांचे हे मिश्रण चवीला अतिशय झणझणीत असते. श्रीलंकेत गेल्यावर तिथला जगप्रसिद्ध सिलोन चहा प्यायला विसरू नका.

जर तुम्ही दिल्ली किंवा मुंबईहून कोलंबोच्या ट्रिपचे नियोजन करत असाल, तर प्रति व्यक्ती २५,००० ते ३५,००० रुपयांच्या दरम्यान खर्च येऊ शकतो. यामध्ये विमान तिकीट, राहण्याचा खर्च आणि फिरणे समाविष्ट आहे. जर तुम्ही कपल म्हणून किंवा ग्रुपमध्ये जात असाल, तर हा खर्च आणखी कमी होऊ शकतो. प्रवासाचे पॅकेज आधीच बुक करणे केव्हाही सोयीचे आणि स्वस्त पडते.