Travel : मुंबई-पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हा' सीक्रेट समुद्र किनारा! तुम्ही पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:44 IST2026-03-26T12:37:28+5:302026-03-26T12:44:24+5:30
मुंबईच्या धकाधकीतून अवघ्या काही तासांत किंवा पुण्याच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडून एखाद्या निवांत जागी जावंसं वाटत असेल, तर 'हे' तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे.

पुणे आणि मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यातून सुटका हवी असेल, तर आपण सहसा अलिबाग किंवा लोणावळ्याचा विचार करतो. पण अलिबागच्या मुख्य किनाऱ्यांपासून थोडं लांब, एका शांत कोपऱ्यात असं एक ठिकाण दडलंय जिथे पोहोचल्यावर खरोखरच वेळ थांबल्याचा भास होतो. ते ठिकाण म्हणजे— आवास समुद्रकिनारा.

मुंबईच्या धकाधकीतून अवघ्या काही तासांत किंवा पुण्याच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडून एखाद्या निवांत जागी जावंसं वाटत असेल, तर 'आवास' हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. अलिबागपासून जवळ असूनही, व्यावसायिकतेच्या गजबजाटापासून हा किनारा आजही लांब आहे.

आवास किनाऱ्यावर पाऊल ठेवताच तुम्हाला जाणवते ती म्हणजे कमालीची शांतता. इथे मांडवा किंवा अलिबागसारखी पर्यटकांची गर्दी नसते. फक्त लाटांचा आवाज, किनाऱ्यावरील सुरुच्या झाडांची सळसळ आणि दूरवर पसरलेली पांढरी शुभ्र वाळू. या निसर्गरम्य वातावरणात तासनतास कधी निघून जातात, हे समजतच नाही.

अलिबागच्या इतर किनाऱ्यांच्या तुलनेत आवासचा किनारा अत्यंत स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आहे. किनाऱ्याला लागूनच असलेल्या झाडांच्या सावलीत तुम्ही पिकनिकचा आनंद घेऊ शकता किंवा निवांत पुस्तक वाचत बसू शकता. जर तुम्हाला रिल्स बनवण्याची किंवा फोटोग्राफीची आवड असेल, तर इथला सूर्यास्त तुमच्या कॅमेऱ्यात कैद करणं ही एक पर्वणीच असते.

मुंबईहून आवासला जात असाल, तर गेटवे ऑफ इंडिया किंवा भाऊचा धक्का येथून मांडवासाठी बोट पकडा. मांडवा जेट्टीपासून आवास अवघ्या ५-१० मिनिटांच्या अंतरावर आहे. जर, पुण्याहून येत असाल तर, लोणावळा-ताम्हिणी घाटमार्गे तुम्ही साधारण ३-४ तासांत स्वतःच्या गाडीने इथे पोहोचू शकता.

आवासच्या आसपास अनेक छोटेखानी होमस्टे आहेत. तिथे तुम्हाला अस्सल कोकणी पद्धतीचं जेवण आणि उकडीचे मोदक चाखायला मिळतील. घरगुती पद्धतीचं हे जेवण तुमच्या ट्रीपची मजा द्विगुणित करतं.

आवास हे एक शांत ठिकाण असल्याने तिथे जाताना निसर्गाचा आदर करा. प्लॅस्टिकचा कचरा करू नका, जेणेकरून हे सिक्रेट ठिकाण असंच सुंदर राहील.

















