Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:45 IST2025-12-12T15:39:32+5:302025-12-12T15:45:19+5:30
या हिवाळ्यात तुम्हाला बर्फवृष्टीचा मनसोक्त आनंद घ्यायचा आहे, पण मनालीच्या वाढलेल्या गर्दीत आणि गोंधळात अडकायचे नाहीये? तर, हे खास ठिकाण तुमच्यासाठीच आहे.

या हिवाळ्यात तुम्हाला बर्फवृष्टीचा मनसोक्त आनंद घ्यायचा आहे, पण मनालीच्या वाढलेल्या गर्दीत आणि गोंधळात अडकायचे नाहीये? तर, हे खास ठिकाण तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला मनालीपासून केवळ २० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शांत, निसर्गरम आणि स्वर्गासारख्या सुंदर ठिकाणाबद्दल सांगणार आहोत.

हिवाळ्यात पर्यटकांचा ओढा हिमाचलकडे असतो आणि मनाली हे सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण आहे. पण वाढत्या गर्दीमुळे शांततेचे क्षण घालवणे कठीण झाले आहे, तसेच इथे सर्व काही खूप महाग झाले आहे. जर तुम्हाला शांतता, कमी गर्दी आणि अद्भुत निसर्गरम अनुभव हवा असेल, तर तुम्हाला मनालीपासून फक्त २० किलोमीटर पुढे जावे लागेल.

हिमाचलच्या कुशीत वसलेले हे ठिकाण म्हणजे नग्गर! हिवाळ्यात जेव्हा इथे बर्फवृष्टी होते, तेव्हा देवदार वृक्षांवर जमा झालेला बर्फ, दूरवर पसरलेली पांढरी शुभ्र चादर आणि आकाशातून हळुवारपणे पडणारे बर्फाचे थेंब... हे दृश्य पाहून तुम्ही दुसऱ्याच जगात आल्यासारखे वाटेल.

नग्गर हे एक छोटेसे ऐतिहासिक गाव आहे, जे शतकानुशतके जुन्या कथा, नैसर्गिक सौंदर्य आणि पर्वतांच्या शांत हवेने समृद्ध आहे.या भागात असलेला 'नग्गर कॅसल' हा १५ व्या शतकात राजा सिद्दी सिंह यांनी बांधलेला एक प्राचीन किल्ला आहे, ज्याचे रूपांतर आता हेरिटेज हॉटेलमध्ये झाले आहे. येथून बियास नदी आणि हिमालयीन शिखरांचे विहंगम दृश्य दिसते.

याच भागातील निकोलस रोरिक आर्ट गॅलरी प्रसिद्ध रशियन कलाकार निकोलस रोरिक यांचे हे जुने निवासस्थान आहे. इथे हिमालयीन कला आणि संस्कृतीवर आधारित चित्रे आणि कलाकृतींचा संग्रह पाहता येतो. यासोबतच गायत्री देवी मंदिर, त्रिपुरा सुंदरी मंदिर, जोगनी धबधबा ही ठिकाणे देखील बघण्यासारखी आहेत.

नग्गरचा सर्वात आकर्षक आणि सुंदर स्पॉट म्हणजे जोगनी धबधबा. हिवाळ्यात बर्फाने वेढलेला हा धबधबा अधिकच सुंदर दिसतो. इथे तुम्ही सिड्डू, मक्याची रोटी आणि चण्याची डाळ यांसारख्या स्थानिक पहाडी पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. याशिवाय, नग्गर हॉट स्प्रिंग्स येथे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे देखील आहेत.

तुम्ही ॲडव्हेंचरचे शौकीन असाल तर नग्गर तुमच्यासाठी उत्तम आहे. चंद्रखणी पास ट्रेक किंवा जलोरी पासकडे छोटी हायकिंग करू शकता. डोबरा आणि बुरुआ येथे पॅराग्लायडिंगचा थरारक अनुभव घेता येईल. या ठिकाणी तुम्ही बाईक भाड्याने घेऊन पर्वतांवर बाइकिंगचा आनंद घेऊ शकता.

दिल्लीहून नग्गरसाठी थेट वाहनसेवा उपलब्ध नाही. तुम्हाला प्रथम बस, ट्रेन किंवा विमानाने मनालीला पोहोचावे लागेल. त्यानंतर मनालीतून तुम्ही खासगी टॅक्सी भाड्याने घेऊन फक्त २० किलोमीटरवर असलेल्या नग्गरला पोहोचू शकता. राहण्यासाठी येथे अनेक स्वस्त आणि सुंदर होमस्टे उपलब्ध आहेत.

















