Travel : एका देशापेक्षाही मोठं आहे 'हे' बेट! उणे १२ अंशातही पर्यटकांची तुफान गर्दी, पाहा जादुई फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 19:15 IST2026-02-22T19:01:29+5:302026-02-22T19:15:38+5:30

कडाक्याच्या थंडीतही या बेटाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक येथे गर्दी करत आहेत.

सध्या संपूर्ण युरोप कडाक्याच्या थंडीने गारठला असताना, जर्मनीतील 'रूगेन द्वीप' मात्र एखाद्या परीकथेतील जादुई जगासारखे भासू लागले आहे. चहूकडे पसरलेली पांढरीशुभ्र बर्फाची चादर, उणे १२ अंशांपर्यंत खाली घसरलेला पारा आणि बाल्टिक समुद्राच्या लाटांवर साचलेला बर्फ, या सौंदर्याने पर्यटकांना वेड लावले आहे.

कडाक्याच्या थंडीतही या बेटाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक येथे गर्दी करत आहेत. जर्मनीतील हे सर्वात मोठे बेट असून याचे क्षेत्रफळ ९२६ चौरस किलोमीटर आहे. विशेष म्हणजे, आकाराच्या बाबतीत हे बेट सिंगापूर देशापेक्षाही मोठे आहे.

५७४ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेल्या या बेटाला 'बाल्टिक समुद्राची राणी' असेही संबोधले जाते. सध्या या बेटाचा कानाकोपरा बर्फाच्या जाड थराखाली दबलेला असून, हे दृश्य एखाद्या पांढऱ्या शुभ्र वाळवंटासारखे दिसत आहे.

रूगेन बेटावरील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 'सेल्लिन पिअर'. ३९४ मीटर लांब असलेला हा पूल आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेसाठी जगप्रसिद्ध आहे. जेव्हा रात्रीच्या वेळी या पुलावरील दिवे उजळतात, तेव्हा बर्फावरून परावर्तित होणारा तो प्रकाश एक अलौकिक दृश्य निर्माण करतो. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पर्यटकांची मोठी चढाओढ पाहायला मिळते.

रक्त गोठवणाऱ्या थंडीतही येथील पर्यटनाचे आकर्षण कमी झालेले नाही. येथे दरवर्षी १५ लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. या बेटाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे 'डायव्हिंग गोंडोला'. ही एक विशेष यंत्रणा असून, त्याद्वारे पर्यटक समुद्राच्या गोठवणाऱ्या लाटांच्या खाली जाऊन पाण्याखालचे अद्भूत विश्व सुरक्षितपणे पाहू शकतात.

सध्या येथील वातावरण अत्यंत आव्हानात्मक आहे. तापमान उणे १२ अंशांच्या खाली गेल्याने आणि सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नसल्याने साचलेला बर्फ वितळण्याचे नाव घेत नाहीये. तरीही, निसर्गाचे हे 'विंटर वंडरलँड' रूप डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांचा ओघ सुरूच आहे.