By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:10 IST
1 / 6भारत आणि पाकिस्तानमधील सीमारेषेबद्दल आपण अनेक चित्रपट पाहिले असतील, वाघा बॉर्डरचा थरारही अनुभवला असेल. पण लडाखच्या दुर्गम भागात वसलेलं 'तुरतुक' हे गाव मात्र एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. कधीकाळी पाकिस्तानच्या ताब्यात असलेले हे गाव आज भारताचे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. निसर्गाचं अलौकिक सौंदर्य आणि तिथली 'बाल्टी' संस्कृती पर्यटकांना भुरळ घालत आहे.2 / 6तुरतुकची गोष्ट मोठी रंजक आहे. १९४७ च्या फाळणीनंतर हे गाव पाकिस्तानचा भाग बनलं होतं. मात्र, १९७१ च्या भारत-पाक युद्धात भारतीय लष्कराने आपल्या शौर्याने हे गाव परत मिळवलं. तेव्हापासून हे गाव भारताचा अविभाज्य भाग आहे. सीमेपासून अवघ्या ८ किलोमीटरवर असलेल्या या गावानंतर 'थांग' नावाची जागा आहे, जी शत्रूच्या स्नायपर रेंजमध्ये येते, पण तुरतुक मात्र पर्यकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.3 / 6सुमारे २,५०० लोकसंख्या असलेल्या या गावात आजही 'बाल्टी' भाषा बोलली जाते. येथील जर्दाळू अतिशय प्रसिद्ध आहे. पर्यकांसाठी येथे पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. १६ व्या शतकातील प्राचीन मशीद आणि 'पोलो ग्राउंड', बाल्टी हेरिटेज होम आणि बाल्टी म्युझियम, तर शांतता आणि निसर्ग सौंदर्याचा संगम असलेला हा गोम्पा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.4 / 6जेव्हा १९७१ मध्ये हे गाव भारतात आले, तेव्हा अनेक कुटुंबांची फाळणी झाली. एकाच कुटुंबातील काही लोक भारतात राहिले, तर काही पाकिस्तानातच अडकले. आता भारत सरकारने अशा लोकांसाठी व्हिसाची प्रक्रिया सुलभ केली असली तरी, कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या नातेवाईकांना भेटणे हे आजही खर्चीक आणि भावूक काम आहे.5 / 6तुरतुकमध्ये राहण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. येथे इस्रायली पर्यटकांची मोठी गर्दी असते, त्यामुळे अनेक गेस्ट हाऊसमध्ये ८०० ते १००० रुपयांत रूम उपलब्ध होतात. जर तुम्हाला स्थानिक संस्कृतीचा जवळून अनुभव घ्यायचा असेल, तर 'होम स्टे' हा सर्वोत्तम पर्याय आहे. अवघ्या ३५० रुपयांपासून येथे राहण्याची आणि घरगुती जेवणाची सोय होऊ शकते. इथले लोक पर्यटकांचे मनापासून स्वागत करतात.6 / 6तुरतुकला जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लेह जिल्हा प्रशासनाकडून 'इनर लाईन परमिट' घेणे आवश्यक आहे. हे परमिट ५ दिवसांसाठी वैध असते. तुम्ही स्वतः प्रशासकीय कार्यालयात जाऊन किंवा लेहमधील कोणत्याही मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजन्सीकडून ते मिळवू शकता. लक्षात ठेवा, प्रशासकीय कार्यालय संध्याकाळी ५ वाजता बंद होते, त्यामुळे वेळेचे नियोजन करूनच परमिट काढा.