Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 17:01 IST2026-04-07T16:56:52+5:302026-04-07T17:01:47+5:30

Chandrtaal : हिमाचल प्रदेशातील लाहुल-स्पिती खोऱ्यात वसलेले चंद्रताल हे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे.

हिमाचल प्रदेशातील लाहुल-स्पिती खोऱ्यात वसलेले चंद्रताल हे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ४,३०० मीटर उंचीवर असलेल्या या सरोवराचा आकार अर्धवर्तुळाकार म्हणजेच चंद्रासारखा असल्याने याला 'चंद्रताल' असे म्हणतात.

चंद्रतालला जाण्यासाठी मुख्य दोन मार्ग आहेत. मनाली हा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग आहे. मनालीहून निघाल्यावर तुम्ही अटल टनेल किंवा रोहतांग पास पार करून 'ग्रामफू'ला पोहोचता. तिथून काझाच्या दिशेने जाताना 'बातल' लागते. बातलपासून १४ किमी अंतरावर हे सरोवर आहे. मनाली ते चंद्रताल हे अंतर कापायला साधारण ७ ते ८ तास लागतात.

दुसरा काझा मार्गे, जर तुम्ही स्पिती व्हॅलीच्या दौऱ्यावर असाल, तर काझाकडून लोसरमार्गे आणि कुंझुम पास ओलांडून तुम्ही चंद्रतालला पोहोचू शकता. तुम्ही स्वतःची कार, खासगी टॅक्सी किंवा मनालीहून सुटणारी सरकारी बस वापरू शकता.

चंद्रताल या सरोवराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पाण्याचे बदलणारे रंग. सूर्यप्रकाशानुसार पाण्याचा रंग निळा, हिरवा आणि कधीकधी फिरोजी दिसतो. सरोवराच्या संथ पाण्यात आजूबाजूच्या पर्वतशिखरांचे प्रतिबिंब पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो.

वाटेत लागणारा कुंझुम पास हा १५,००० फूट उंचीचा घाट थरारक वळणांसाठी आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील बौद्ध स्तूप आणि हवेत फडकणारे रंगीत ध्वज मनाला शांती देतात.

चंद्रताल सरोवरापासून साधारण २ किमी अंतरावर कॅम्पिंगची सोय असते. प्रदूषण नसल्यामुळे रात्रीचे आकाश इतके स्वच्छ असते की तुम्ही 'मिल्की वे' आणि असंख्य तारे उघड्या डोळ्यांनी पाहू शकता. प्रवासात बातल येथे थांबून प्रसिद्ध 'चंद्रा ढाब्यावर' जेवण करायला विसरू नका. येथील मालकांचे पाहुणचार आणि त्यांच्या कथा प्रवासाचा थकवा दूर करतात.

मनालीपासून दोन दिवसांच्या सहलीसाठी प्रति व्यक्ती अंदाजे ४,००० ते ७,००० रुपये खर्च येऊ शकतो. यामध्ये येण्या-जाण्याचा प्रवास (शेअर्ड टॅक्सी किंवा बस), तंबूमधील राहण्याचा खर्च आणि जेवणाचा समावेश होतो. जर तुम्ही स्वतःची खासगी टॅक्सी भाड्याने घेतली, तर हा खर्च वाढू शकतो.

चंद्रताल हे सरोवर केवळ जूनच्या मध्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत खुले असते. हिवाळ्यात रस्ते बर्फामुळे बंद असतात. खूप उंचीवर असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासू शकते. त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि घाई न करता सावकाश फिरा. रात्रीचे तापमान उणे जाऊ शकते, त्यामुळे दर्जेदार जॅकेट, थर्मल वेअर आणि कानटोपी सोबत ठेवणे अनिवार्य आहे. येथे मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे ऑफलाईन नकाशे सोबत ठेवा आणि घरी आधीच कळवून ठेवा.