Travel : व्हॅलेंटाईन वीकमध्ये पार्टनरला द्या सरप्राईज! 'ही' आहेत भारतातील ५ स्वस्त आणि रोमँटिक ठिकाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 21:36 IST2026-02-05T21:32:08+5:302026-02-05T21:36:00+5:30

आपल्या भारतात अशी काही ठिकाणे आहेत जी दिसायला स्वर्गासारखी सुंदर आहेत आणि खिशालाही परवडणारी आहेत.

फेब्रुवारी महिना उजाडला की वेध लागतात ते व्हॅलेंटाईन वीकचे! हा आठवडा म्हणजे आपल्या जोडीदाराप्रती प्रेम व्यक्त करण्याची एक सुवर्णसंधी. जर तुम्हीही या व्हॅलेंटाईनला आपल्या पार्टनरला एखादं खास सरप्राईज देण्याचा विचार करत असाल, पण खिशाचा विचार करून अडखळत असाल, तर काळजी सोडून द्या.

आपल्या भारतात अशी काही ठिकाणे आहेत जी दिसायला स्वर्गासारखी सुंदर आहेत आणि खिशालाही परवडणारी आहेत. चला तर मग, जाणून घेऊया अशा ५ रोमँटिक ठिकाणांबद्दल जिथे तुम्ही कमी खर्चात आयुष्यभराच्या आठवणी साठवू शकता.

पुद्दुचेरी: काहीतरी वेगळं आणि हटके शोधत असाल तर पुद्दुचेरीला नक्की भेट द्या. येथील फ्रेंच वास्तुकला, शांत समुद्रकिनारे आणि सुंदर कॅफे तुम्हाला परदेशात असल्याचा भास करून देतील. विशेष म्हणजे इथे तुम्ही सायकल भाड्याने घेऊन संपूर्ण शहर फिरू शकता. शांत बीचवर आपल्या पार्टनरचा हात हातात घेऊन फिरण्यासाठी हे सर्वात स्वस्त आणि मस्त ठिकाण आहे.

उदयपूर: राजस्थानमधील 'सिटी ऑफ लेक्स' म्हणून ओळखलं जाणारे उदयपूर आपल्या जोडीदाराला रॉयल फील देण्यासाठी उत्तम आहे. पिछोला लेक, सिटी पॅलेस आणि इथले किल्ले तुमचे मन जिंकतील. तुम्हाला वाटत असेल की हे महागडं आहे, तर तसं नाही! उदयपूरमध्ये बजेट होमस्टे आणि स्वस्त राजस्थानी थाळीचे अनेक पर्याय आहेत. संध्याकाळी तलावाच्या काठी बसून सूर्यास्त पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो.

नैनिताल: नैनिताल हे भारतातील सर्वात रोमँटिक हिल स्टेशन्सपैकी एक मानलं जातं. 'नैनी' सरोवरामध्ये जोडीदारासोबत केलेली बोटिंग एखाद्या चित्रपटातील सीनसारखी वाटते. उंच डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे शहर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही नैना पीकवर जाऊ शकता. येथील स्थानिक खाऊ गल्ली आणि स्वस्त हॉटेल्समुळे ही ट्रिप तुमच्या बजेटमध्ये सहज बसते.

मनाली: जर तुम्हाला गुलाबी थंडी आणि बर्फाच्छादित डोंगर आवडत असतील, तर मनालीसारखा दुसरा पर्याय नाही. फेब्रुवारी महिन्यात मनालीचं सौंदर्य विलोभनीय असतं. येथील हिडिंबा मंदिर, तिबेटी मठ आणि मॉल रोडवरची गर्दी मनाला प्रसन्न करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, इथे राहण्यासाठी कमी बजेटमध्ये अनेक चांगले गेस्ट हाऊस आणि हॉटेल्स उपलब्ध होतात, ज्यामुळे तुमचा खिसाही फारसा रिकामा होत नाही.

आग्रा: प्रेमाचं नाव निघालं की डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे 'ताजमहल'. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला हा ताज म्हणजे प्रेमाचं सर्वोच्च प्रतीक! दिल्ली किंवा आसपासच्या शहरांत राहणाऱ्या कपल्ससाठी आग्रा हे सर्वात जवळचं आणि स्वस्त ठिकाण आहे. ताजमहालच्या सावलीत बसून जोडीदारासोबत घालवलेले क्षण तुम्हाला कायमचे लक्षात राहतील. यमुना नदीच्या काठावर संध्याकाळी केलेली भटकंती तुमच्या ट्रिपला आणखी रोमँटिक करेल.