Travel : केरळ सहलीचा प्लॅन करताय? या '५' निसर्गरम्य ठिकाणांना भेट दिल्याशिवाय तुमची ट्रिप पूर्णच होणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:55 IST2026-02-18T19:49:13+5:302026-02-18T19:55:03+5:30
तुम्ही जर पहिल्यांदाच केरळला जात असाल, तर काही ठिकाणं अशी आहेत जी चुकवून चालणार नाही.

निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं केरळ, ज्याला जग 'God's Own Country' म्हणून ओळखतं, हे पर्यटकांच्या आवडीचं पहिलं ठिकाण आहे. उंच डोंगररांगा, अथांग समुद्रकिनारे आणि शांत बॅकवॉटरमुळे इथली प्रत्येक जागा मनाला भुरळ घालते. पण, तुम्ही जर पहिल्यांदाच केरळला जात असाल, तर काही ठिकाणं अशी आहेत जी चुकवून चालणार नाही.

वर्कला : नेहमीच्या गर्दीच्या बीचपेक्षा काहीतरी वेगळं पाहायचं असेल, तर वर्कलाच्या बीचला नक्की भेट द्या. हे भारतातील अशा दुर्मिळ ठिकाणांपैकी एक आहे, जिथे समुद्रकिनाऱ्याला लागूनच उंच खडकाळ डोंगर आहेत. डोंगरावरील कॅफेमध्ये बसून समुद्राच्या लाटा पाहण्याचा आनंद काही औरच असतो. खास आकर्षण: पापनाशम बीच, सर्फिंग आणि सनबाथ.

कोच्ची : 'अरबी समुद्राची राणी' म्हणून ओळखले जाणारे कोच्ची शहर तुम्हाला इतिहासात घेऊन जाते. फोर्ट कोच्ची परिसरातील चिनी मासेमारी जाळी सूर्यास्ताच्या वेळी अतिशय सुंदर दिसतात. येथील जुन्या पोर्तुगीज धाटणीची घरे आणि ज्यू टाऊनमधील बाजारपेठ पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. काय पाहाल: कथकली नृत्य सादरीकरण आणि प्राचीन चर्च.

वायनाड : गडद हिरवे जंगल, धबधबे आणि ट्रेकिंगची आवड असेल, तर वायनाड तुमच्यासाठी बेस्ट आहे. उत्तर केरळमध्ये वसलेलं हे ठिकाण ऐतिहासिक महत्त्वाचंही आहे. येथील एडक्कल लेण्यांमधील प्राचीन कोरीव काम पाहण्यासारखं आहे. काय पाहाल: बाणासुर सागर डॅम आणि मीनमुट्टी धबधबा.

अलेप्पी : जर तुम्हाला संथ पाण्यावर तरंगणाऱ्या घरात राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर अलेप्पीला नक्की जा. येथील 'हाउसबोट'मधील मुक्काम हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरतो. नारळाच्या झाडांच्या सावलीत आणि भाताच्या खाचरांच्या मधून जाणाऱ्या कालव्यांमधून प्रवास करताना मिळणारी शांतता शब्दांत सांगण्यापलीकडची आहे. खास आकर्षण: हाऊसबोट मुक्काम आणि केरळचं पारंपारिक जेवण.

मुन्नार : केरळच्या सहलीची सुरुवात मुन्नारशिवाय होऊच शकत नाही. तीन नद्यांच्या संगमावर वसलेले हे हिल स्टेशन चहाच्या विस्तीर्ण मळ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. धुक्यात हरवलेल्या टेकड्या आणि येथील शुद्ध हवा तुमच्या प्रवासाचा थकवा क्षणात घालवेल. काय पाहाल: इराविकुलम नॅशनल पार्क, मट्टुपेट्टी डॅम आणि चहाची संग्रहालयं.

















