Travel : सिंगापूरला जाताय? मग 'हा' नवीन नियम आधी वाचा, नाहीतर एअरपोर्टवरूनच यावं लागेल परत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 20:40 IST2026-02-04T20:36:09+5:302026-02-04T20:40:18+5:30
जर तुम्ही २०२६ मध्ये सिंगापूरच्या सहलीचे नियोजन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

जर तुम्ही २०२६ मध्ये सिंगापूरच्या सहलीचे नियोजन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या सिंगापूरने आपल्या प्रवेश नियमांत मोठा बदल केला आहे.

सिंगापूरच्या इमिग्रेशन अँड चेकपॉइंट्स अथॉरिटीने ३० जानेवारी २०२६ पासून 'नो-बोर्डिंग डायरेक्टिव्ह' लागू केला आहे. या नव्या नियमामुळे आता प्रवाशांची तपासणी सिंगापूरला पोहोचल्यावर नाही, तर विमानात चढण्यापूर्वीच केली जाणार आहे.

आतापर्यंत सिंगापूरला पोहोचल्यानंतर इमिग्रेशन काउंटरवर प्रवाशांची कागदपत्रे तपासली जात होती. मात्र, नव्या नियमानुसार चांगी आणि सेलेटर एअरपोर्टवर येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सच्या प्रवाशांची माहिती आधीच तपासली जाईल. एअरलाईनकडे असलेल्या माहितीच्या आधारे जर एखादा प्रवासी सिंगापूरमध्ये प्रवेशासाठी अपात्र ठरला, तर त्याला विमानात चढण्यापूर्वीच रोखले जाईल.

जर तुम्ही 'या' चुका केल्या असतील, तर तुम्हाला एअरपोर्टवरच 'नो बोर्डिंग'चा बोर्ड दिसू शकतो. यामध्ये तुमच्याकडे वैध सिंगापूर व्हिसा नसेल तर, तुमच्या पासपोर्टची वैधता ६ महिन्यांपेक्षा कमी असेल तर, तुम्ही 'SG अरायव्हल कार्ड' भरले नसेल किंवा त्यात चुकीची माहिती दिली असेल तर, तुमच्यावर यापूर्वी इमिग्रेशन किंवा सुरक्षिततेशी संबंधित काही नकारात्मक रेकॉर्ड असतील तर एंट्री नाकारली जाऊ शकते.

सिंगापूर सरकारने हा नियम केवळ प्रवाशांसाठीच नाही तर विमान कंपन्यांसाठीही कडक केला आहे. नियमांचे उल्लंघन करून अपात्र प्रवाशाला विमानात बसवल्यास संबंधित एअरलाईनला १०,००० सिंगापूर डॉलर्सपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच संबंधित कर्मचाऱ्यावरही कारवाई होऊ शकते.

सिंगापूरला जाण्यापूर्वी तुमचा पासपोर्ट, व्हिसा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'SG अरायव्हल कार्ड' व्यवस्थित तपासा. जर तुम्हाला बोर्डिंग नाकारले गेले, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच सिंगापूरला जाऊ शकत नाही.

अशा वेळी तुम्ही सिंगापूर इमिग्रेशनच्या फीडबॅक चॅनेलद्वारे संपर्क साधून स्पष्टीकरण देऊ शकता. त्यामुळे प्रवासाची बॅग भरण्यापूर्वी कागदपत्रांची बॅग एकदा नक्की तपासा, जेणेकरून तुमची ट्रिप आनंदात पार पडेल!

















