By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 13:46 IST
1 / 7भारतात चहा हे केवळ एक पेय नसून तो एक इमोशन आहे. सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळचा थकवा घालवणे, चहाप्रेमींसाठी एक कप कडक चहा म्हणजे सर्व सुखांचे सार! पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की तुमच्या कपामधला हा सुगंधी चहा नक्की येतो कुठून? 2 / 7भारतातील चहाचे मळे केवळ चहा उत्पादनासाठीच नाही, तर त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीही जगप्रसिद्ध आहेत. जर तुम्ही निसर्गप्रेमी आणि चहाचे शौकीन असाल, तर या ५ ठिकाणांना नक्की भेट द्यायला हवी.3 / 7कांगडा, हिमाचल प्रदेश: हिमाचलमधील कांगडा घाटी ही उत्तर भारताची चहाची राजधानी मानली जाते. धौलाधार पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेले हे मळे अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहेत. जर तुम्हाला गर्दीपासून दूर कुठेतरी शांततेत वेळ घालवायचा असेल, तर पालमपूर आणि कांगडा येथील चहाचे मळे तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत.4 / 7कुन्नूर, तामिळनाडू: ऊटी जवळ असलेले कुन्नूर हे एक शांत हिल स्टेशन आहे. येथील 'नीलगिरी चहा' त्याच्या सौम्य गोडव्यासाठी आणि सुगंधासाठी ओळखला जातो. येथील डोंगरउतारावर असलेले चहाचे मळे फोटोग्राफीच्या शौकीनांसाठी स्वर्गच आहेत. येथे तुम्ही 'टी टेस्टिंग' सेशनमध्ये सहभागी होऊन चहाच्या विविध प्रकारांची चव घेऊ शकता.5 / 7आसाम व्हॅली, आसाम: जर तुम्हाला कडक आणि गडद रंगाचा चहा आवडत असेल, तर आसाम तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी वसलेले हे मळे जगातील सर्वात मोठे चहा उत्पादक क्षेत्र आहेत. येथे ब्रिटीश काळातील अनेक बंगल्यांचे आता 'हेरिटेज स्टे'मध्ये रूपांतर करण्यात आले आहे, जिथे राहून तुम्ही चहाच्या मळ्यातील जीवनाचा अनुभव घेऊ शकता.6 / 7मुन्नार, केरळ: केरळमधील मुन्नार हे ठिकाण तिथल्या वळणावळणाच्या चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंचीवर असलेले हे मळे दुरून एखाद्या हिरव्या मखमली गालिच्यासारखे दिसतात. येथे तुम्ही 'टाटा टी म्युझियम'ला भेट देऊन चहा बनवण्याच्या जुन्या आणि नवीन पद्धती पाहू शकता. मकातील धुक्याची दुलई आणि हातात वाफाळलेला चहा, असा अनुभव तुम्हाला इथेच मिळेल.7 / 7दार्जिलिंग, पश्चिम बंगाल: जेव्हा विषय उत्कृष्ट चहाचा येतो, तेव्हा दार्जिलिंगचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. येथील चहाला त्याच्या अद्वितीय सुगंधामुळे 'शॅम्पेन ऑफ टी' म्हटले जाते. हिमालयाच्या शिवालिक रांगांमध्ये पसरलेले हे मळे आणि समोर दिसणारी कांचनगंगा शिखराची पांढरीशुभ्र चादर... हा नजारा तुमचा चहाचा आनंद द्विगुणित करेल.