Travel : दुबई स्वप्ननगरी! किती खर्चात होईल ५ दिवसांची शाही सफर; वाचा संपूर्ण बजेट आणि जाणून घ्या व्हिसाबद्दल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:34 IST2025-12-11T14:29:57+5:302025-12-11T14:34:02+5:30

जर, तुम्हीसुद्धा पहिल्यांदा दुबईला जाण्याचा विचार करत असाल, तर मनात पहिला प्रश्न येतो तो "खर्च किती येणार?" आणि "व्हिसा कसा मिळणार?"

उंचच उंच इमारती, शाही जीवनशैली आणि जगाचं बिझनेस हब... वाळवंटाच्या रेतीतून उठून उभी राहिलेली ही स्वप्ननगरी म्हणजेच दुबई. दरवर्षी लाखो भारतीय या शहराच्या आकर्षणापोटी इथे भेट देतात. जर, तुम्हीसुद्धा पहिल्यांदा दुबईला जाण्याचा विचार करत असाल, तर मनात पहिला प्रश्न येतो - "खर्च किती येणार?" आणि "व्हिसा कसा मिळणार?" तुमच्या याच प्रश्नांची उत्तरे आणि दुबई ट्रिपशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची माहिती खास तुमच्यासाठी!

दुबईची यात्रा तुमच्या राहण्याच्या दिवसांवर, जीवनशैलीवर आणि बजेटवर अवलंबून असते. पण, तुम्ही एक सरासरी ५ ते ६ दिवसांची ट्रिप प्लान करत असाल, तर त्याचा अंदाजित खर्च किती येईल जाणून घेऊया. दिल्लीतून दुबईसाठी विमानाचे तिकीट अंदाजे ₹२०००० ते ₹३५०००पर्यंत असू शकते. तर, ३ स्टार हॉटेलमध्ये एका रात्रीचा खर्च ₹४००० ते ₹६००० पर्यंत येतो. दररोजचा खाण्यापिण्याचा खर्च सुमारे ₹१००० ते ₹१५०० रुपये एवढा लागेल.

लोकल ट्रान्सपोर्टसाठी (मेट्रो/बस) प्रतिदिन ₹५०० ते ₹१००० खर्च येऊ शकतो. नोल कार्ड वापरून प्रवास करणे सोपे होते. दुबईतील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी तुम्हाला सुमारे ₹१०००० ते ₹१५००० तिकीटांवर खर्च करावे लागतील. या सगळ्याचा हिशेब केला, तर एका व्यक्तीसाठी दुबई प्रवासाचा एकूण अंदाजित खर्च ₹६०००० ते ₹९०००० पर्यंत येऊ शकतो. तुम्ही ग्रुपमध्ये गेलात किंवा ट्रॅव्हल पॅकेज निवडले, तर हा खर्च आणखी कमी होऊ शकतो.

दुबई म्हणजे केवळ बुर्ज खलिफा नाही, तर इथे अनेक अद्भुत ठिकाणं आहेत. तुमचा प्रवास संस्मरणीय बनवण्यासाठी दुबई मॉल, डेझर्ट सफारी,पाम जुमेराह, दुबई फ्रेम आणि मिरेकल गार्डन या टॉप प्लेसेस नक्की पाहा.

भारतीय नागरिकांना दुबई जाण्यासाठी यूएई टूरिस्ट व्हिसाची गरज असते. तुमच्याकडे व्हिसा मिळवण्यासाठी दोन सोपे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन व्हिसासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी पासपोर्ट, फोटो, रिटर्न तिकीट आणि हॉटेल बुकिंगचे कागदपत्रे अपलोड करावे लागतील. व्हिसा मिळण्यासाठी साधारणतः २ ते ५ दिवस लागू शकतात.

अनेक ट्रॅव्हल एजन्सी व्हिसा, तिकीट आणि हॉटेलचे संपूर्ण पॅकेज ऑफरसह देतात. त्यांचा वापर करून तुम्ही व्हिसा सहज मिळवू शकता. तुम्हाला १४ दिवस, ३० दिवस किंवा ९० दिवसांसाठी व्हिसा मिळू शकतो. व्हिसाच्या प्रकारानुसार त्याची फी साधारणपणे ₹६००० ते ₹१०००० असू शकते. जर, तुमच्याकडे अमेरिका किंवा शेंजेन देशांचा व्हिसा असेल, तर तुम्हाला दुबईमध्ये 'व्हिसा ऑन अरायव्हल'ची सुविधा देखील मिळू शकते.

ट्रिपला निघण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या पासपोर्टची वैधता किमान ६ महिने असणे आवश्यक आहे. दुबईचे उष्ण हवामान आणि तुम्ही भेट देणार असलेल्या ठिकाणांनुसार योग्य कपडे पॅक करा. दुबईचे स्थानिक चलन जवळ ठेवा.