'या' गुहेत जाण्याचा चित्तथरारक अनुभव एकदा घ्याच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 22:46 IST2019-09-11T22:42:04+5:302019-09-11T22:46:03+5:30

जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी रोमांचक आहेत. विशेष म्हणजे त्या ठिकाणांवर थरारक अनुभव येतात. जगभरात अशा अनेक गुहा आहेत, ज्यात आतमध्ये जाणं फार जोखमीचं नाही.
परंतु काही अशाही गुहा आहेत, ज्यात जाणं चित्तथरारक आहे. अशा गुहेत जाण्याचं म्हणजे मृत्यूच्या दारात जाण्यासारखंच आहे. जॉर्जिया देशाच्या पश्चिमी किनाऱ्यावर काकेशस या ठिकाणी एक गुहा आहे, ज्याला क्रूबेरा गुहा असं संबोधलं जातं.
ही गुहा एवढी खोल आहे की, यात उतरणं साहसी आहे. ज्याचं हृदय मजबूत आहे, तेच या गुहेत जाण्याचं धाडस करतात.
तसेच क्रूबेरा ही गुहा एवढी प्रसिद्ध आहे की, तिकडे दूरवरून लोक भेट देतात. जॉर्जियातील क्रूबेरा गुहा जवळपास 2197 मीटर म्हणजेच 7208 फूट खोल आहे.
ही जगातली दुसरी सर्वात मोठी गुहा आहे. या गुहेत प्रवेश करण्यासाठी अनेक कठीण आव्हानांचा सामना करावा लागतो. तसेच वर्षातील फक्त 4 महिन्यांमध्येच या गुहेत प्रवेश करणं शक्य आहे.
कारण या चार महिन्यात मोसम सामान्य असतं. गुहेत प्रवेश करण्याआधी सरकारची परवानगीही घ्यावी लागते. वर्षं 1960मध्ये या गुहेचा शोध लागला होता.