अमेरिकन ओपन विजेत्या टेनिसपटूचा 'Hot' अंदाज; पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 12:37 IST2019-09-10T12:33:50+5:302019-09-10T12:37:08+5:30

अमेरिकेची दिग्गज खेळाडू सेरेना विलियम्सला अमेरिकन ओपन स्पर्धेत अनपेक्षितपणे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिला मार्गारेट कोर्टच्या विश्विविक्रमी 24 जेतेपदांची बरोबरी करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. कॅनडाच्या 19 वर्षीय युवा टेनिसपटू बियांका आंद्रिस्कूने कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम उंचावताना दिग्गज सेरेनला धक्का देण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे आंद्रिस्कू कॅनडाची पहिली एकेरी ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरली.

आंद्रिस्कूने दिग्गज सेरेनाच्या तगड्या आव्हानाचे कोणतेही दडपण न घेताना 6-3, 7-5 असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत बाजी मारली. अमेरिकन ओपनचे जेतेपद जिंकणारी आंद्रिस्कू ही मागील 15 वर्षांतील सर्वात युवा खेळाडू ठरली. याआधी रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोवाने वयाच्या 16व्या वर्षीच यूएस ओपनचे जेतेपद पटकावले होते.

सेरेनाने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद 1999 साली जिंकले होते. दखल घेण्याची बाब म्हणजे त्यावेळी बियांका आंद्रिस्कूचा जन्मही झाला नव्हता. रोमानियन पालक असलेल्या आंद्रिस्कूचा जन्म हा ओंटारियो येथील मिस्सिसौगा येथील. वयाच्या 11 व्या वर्षी तिनं टेनिस खेळण्यास सुरुवात केली.

2015मध्ये ती फ्रेंच ओपनच्या कनिष्ठ गटासाठी पात्र ठरली, परंतु पहिल्याच फेरीत तिला गाशा गुंडाळावा लागला. तिने वयाच्या 15 व्या वर्षी पहिले कनिष्ठ गटाचे जेतेपद पटकावले.

टेनिस कोर्टसह आंद्रिस्कू सोशल मीडियावर सेलिब्रेटी आहे. इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 40 लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या हॉट अॅण्ड बोल्ड फोटोना खूप लाईक्सही मिळतात.

अमेरिकन ओपन स्पर्धेपूर्वी आंद्रिस्कू जागतिक क्रमवारीत 200व्या स्थानावर होती आणि आता तिनं टॉप फाईव्हमध्ये झेप घेतल आहे.




















