तुमचा पत्ता आता असेल ‘डिजिटल’, पोस्टाचा नवा प्रोजेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 08:20 IST2021-11-03T08:10:04+5:302021-11-03T08:20:00+5:30
Digital Address : प्रत्येक घराचा एक युनिक आयडेंटिटी ॲड्रेस असेल. आधार कार्डाप्रमाणेच या डिजिटल ॲड्रेसची रचना असेल.

आपले दैनंदिन जीवन डिजिटलने व्यापले असल्याने अनेक व्यवहार डिजिटलीच केले जातात. घरातील वाणसामानाची खरेदीही डिजिटली होते. खरेदी केलेली प्रत्येक वस्तू घरापर्यंत येण्यासाठी पत्ता अचूक द्यावा लागतो.
मात्र, इथेच अनेकदा गडबड होते. आपण पाठवलेला पत्ता प्रत्येकाला सहज सापडेलच असे नाही. पत्ता नीट न दिल्याने अनेक गमतीजमतीही घडतात. तर आता हा पत्ता डिजिटल होणार आहे.
पोस्टाचा नवा प्रोजेक्ट
दिलेल्या पत्त्यावर पत्र किंवा तत्सम महत्त्वाची कागदपत्रे वेळेवर पोहोचवणे हे पोस्टाचे महत्त्वाचे काम असते. त्यामुळे अचूक पत्त्याला पोस्टात अधिक महत्त्व दिले जाते. अनेकदा चुकीचा पत्ता किंवा पिनकोड दिला जातो. त्यामुळे गोंधळ होतो. त्यामुळे आता पोस्टाने डिजिटल ॲड्रेस कोड नावाचा नवा प्रोजेक्ट सादर करायचे ठरवले आहे.
प्रोजेक्टचे वैशिष्ट्य
प्रत्येक घराचा एक युनिक आयडेंटिटी ॲड्रेस असेल. आधार कार्डाप्रमाणेच या डिजिटल ॲड्रेसची रचना असेल. प्रत्येक घरासाठी डिजिटल युनिक आयडेंटिटी ॲड्रेस दिल्यानंतर क्यूआर कोड किंवा पत्ता टाइप करून कोणासही देऊ शकता येईल.
उल्लेखनीय म्हणजे डिजिटल मॅपवरही हा ॲड्रेस दिसू शकेल. त्यामुळे ऑनलाइन मागवलेली वस्तू अचूकपणे पत्त्यावर येऊन पोहोचेल. घरांबरोबरच ऑफिस, उंच इमारती, अपार्टमेंट्स यांचेही डिजिटल ॲड्रेस तयार केले जातील.
कशी असेल प्रक्रिया
ट्रेंड कर्मचारी लोकांच्या घरी येतील. पत्त्याचे वेगवेगळे आयडेंटिफिकेशन तयार केले जाईल. पत्ता जियोस्पेशल कोऑर्डिनेट्सशी लिंक केला जाईल. त्यानंतर घरमालकाला डिजिटल ॲड्रेस कोड दिला जाईल. त्यावर नंबर आणि अक्षराबरोबच कोड दिला जाईल. त्यानुसार पत्ता डिजिटलाइज्ड केला जाईल.
प्रोजेक्टचे फायदे
बँक, इन्शुरन्स, टेलिकॉम इत्यादींचे केवायसी करायचे असेल तर त्यांना तुमच्या घरापर्यंत येण्याची गरज भासणार नाही. चुकीच्या पत्त्यावर घरपोच सेवेचा माल जाणार नाही. सरकारी योजनांचा लाभ योग्य व्यक्तींनाच प्राप्त होईल. निवडणूक प्रक्रिया, आपत्ती व्यवस्थापन, जनगणना यांच्या दृष्टीने सोयिस्कर होईल.