भारतात सर्वाधिक विकले गेले Xiaomi चे फोन; जाणून घ्या पहिल्या 5 कंपन्यांमध्ये कोण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 03:19 PM2020-01-25T15:19:30+5:302020-01-25T15:29:37+5:30

भारतीय स्मार्टफोन बाजाराने पहिल्यांदाच एकूण विक्रीच्या बाबतीत अमेरिकेला मागे सोडले आहे. याचबरोबर भारत जगातील दुसरा सर्वात मोठा स्मार्टफोन बाजार बनला आहे. काउंटरपॉईंटच्या अहवालानुसार 2019 मध्ये भारतात पाठविलेल्या स्मार्टफोनची संख्या 158 दशलक्ष म्हणजेच 15.8 कोटी युनिट झाली आहे. हा आकडा 2018 च्या तुलनेत 7 टक्क्यांनी जास्त आहे.

भारतीय बाजारात सर्वाधिक फोन शाओमी या चीनच्य़ा कंपनीचे विकले गेले आहेत. चला जाणून घेऊयात देशातील आघाडीच्या पाच स्मार्टफोन विक्रेत्या कंपन्या.

भारतीय बाजारात पाचवी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे ओप्पो. देशातील एकूण विक्रीत या कंपनीचा वाटा 9 टक्के राहिला आहे. 2018 च्या तुलनेत यामध्ये 28 टक्क्याची वाढ झाली आहे.

चौथ्या स्थानावर रिअलमी आहे. रिअलमी हा ओप्पोचाच ब्रँड आहे. 20 हजारांच्या आतमधील फोन या ब्रँडद्वारे विकले जातात. शाओमीच्या रेडमीला टक्कर देण्यासाठी ओप्पोने ही खेळी खेळली होती.

रिअलमीचे यंदाचे देशातील वाटा 10 टक्के आहे. 2019 मध्ये वेगाने वाढ झालेला हा ब्रँड आहे. 2018 मध्ये या ब्रँडचा बाजारातील वाटा 3 टक्के होता. यंदा या फोनच्या विक्रीत 255 टक्क्यांची वाढ झाली आहे.

16 टक्के विक्रीसह वीवो यंदा तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या तिमाहीमध्ये या कंपनीचे स्मार्टफोन चांगले विकले गेले होते. यावेळी ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर होती.

काही वर्षांपूर्वी सॅमसंगने नोकियाची मक्तेदारी मोडीत काढली होती. यानंतर काही वर्षे सॅमसंगच राज्य करत होती. मात्र, चीनच्या कंपन्यांनी शिरकाव केल्यानंतर या साम्राज्याला सुरंग लागला आहे. मात्र यातून सावरत सॅमसंगने दुसरा क्रमांक कायम ठेवला आहे.

सॅमसंगचा भारतीय बाजारातील वाटा हा 21 टक्के आहे. 2019 मध्ये सॅमसंगचा वाटा ५ टक्क्यांनी घटला आहे. मात्र, महसुलाच्या बाबतीत सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.

पहिल्या क्रमांकावर चीनची कंपनी शाओमीने कब्जा केला आहे. 2019 मध्ये भारतीय बाजारातील वाटा 28 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शाओमीने 5 टक्के वाढ नोंदविली आहे. शाओमीसाठी सर्वाधिक मोठी बाजारपेठ भारतच राहिली आहे.