TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 09:12 AM2021-09-25T09:12:11+5:302021-09-25T09:18:39+5:30

TATA चे SuperApp पुढील वर्षी लॉंच केले जाणार असून, Tata Digital कडून या ॲपची चाचपणी सुरू आहे.

आताच्या घडीला TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

कोरोना संकटामुळे उद्योगविश्वाची घडी विस्कटलेली आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला असून, त्यातून औद्योगिक क्षेत्रही सुटलेले नाही. एकीकडे कंपन्यांमधून कामगारांना कमी करण्यात येत आहे, कामगारांच्या वेतनात कपात करण्यात येत आहे. मात्र, TATA ग्रुपमधील अनेक कंपन्यांनी चांगली कामगिरी करत बोनस जाहीर केला आहे.

TATA ग्रुप आता ग्राहकांसाठी एका SuperApp वर काम करत आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना अगदी ग्रॉसरीपासून ते हॉटेल बुकिंगपर्यंत सर्व गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

याचाच अर्थ TATA ज्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्या त्या क्षेत्रातील सुविधा आता एकाच ॲपवर उपलब्ध होणार असून, ग्राहकांना, युझर्सना एकापेक्षा जास्त सेवांसाठी विविध ॲप वापरण्याची गरज भासणार नाही, असे सांगितले जात आहे.

TATA चे हे SuperApp पुढील वर्षी लॉंच केले जाणार असून, Tata Digital कडून या ॲपची चाचपणी सुरू आहे. त्यासाठी तब्बल ७ लाख कर्मचाऱ्यांना कामाला लावले असल्याचे सांगितले जात आहे. या कर्मचाऱ्यांना हे ॲप वापरण्यासाठी दिले असून, यातील त्रुटी, सुलभता पूर्णपणे तपासून घेतले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मर्यादित वापरासाठी या ॲपचे बीटा व्हर्जन केवळ कर्मचाऱ्यांसाठी खुले करण्यात आले असून, संपूर्ण खात्री झाल्यानंतरच हे ॲप सार्वजनिक स्वरुपात लॉंच केले जाणार आहे. हे ॲप TATA ग्रुपमधील कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने वापरासाठी दिले जात आहे.

Tata Digital च्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले आहे की, SuperApp चे कार्य प्रगतीपथावर आहे. या ॲपच्या कार्यक्षमतेवर सर्वाधिक भर दिला जात आहे. तर अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ॲपच्या माध्यमातून केलेल्या ई-कॉमर्स पेमेंटनंतर ग्राहकांना लॉयल्टी पॉइंट्स मिळतील. याचा वापर TATA च्या अनेकविध ब्रँडमधील खरेदीसाठी करता येऊ शकते.

TATA ग्रुपमधील इंडियन हॉटल्स (Indian Hotels), क्रोमा (Croma), बिगबास्केट (BigBasket), 1एमजी (1mg) आणि Tata इन्शुरन्सच्या एका कंपनीने SuperApp च्या करारावर स्वाक्षरी केली आहे. मात्र टाटा क्लिकने (Tata Cliq) च्या या ॲपमधील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, SuperApp मध्ये सहभागी होण्यासाठी टाटा क्लिकला बिझनस मॉडल काहीसे बदलावे लागेल. तसेच टाटाने या ॲपमधील कॅटगरीबाबत विशेष लक्ष देणे आवश्यक असून, त्या एकमेकांसाठी पूरक असाव्यात, असे अरविंद सिंघल यांनी म्हटले आहे.

संरक्षण मंत्रालयाने ‘सी-295’ या 56 मालवाहतूक विमानांच्या खरेदीसाठी स्पेनच्या एअरबस डिफेन्स अँड स्पेससोबत जवळपास २२००० कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली असून, महत्त्वाचे म्हणजे ही विमाने भारतात बनवण्यात येणार असून टाटा ॲडव्हान्स सोबत मिळून एअरबस या विमानांचे उत्पादन करणार आहे.

दरम्यान, कोरोना संकटकाळातही Tata मोटर्स कंपनीने कामगारांना यंदा दिवाळीसाठी किमान ३८ हजार २०० रुपये ते कमाल ५० हजार २०० रुपये बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा तीन हजार रुपयांनी बोनस जास्त आहे.

या निर्णयाचा फायदा सहा हजार कामगारांना होणार आहे. करोना संकटकाळातील दोन वर्षांसह सलग तीन वर्षे घसघशीत बोनस मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या सूत्रानुसार गेल्या वर्षी ३५ हजार २०० रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा त्यात तीन हजारांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, Tata मोटर्सने ऑगस्ट महिन्याच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवली आहे. यातच Tata ने इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये आघाडी राखून ठेवली आहे.