By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 18:31 IST
1 / 5 LPG Smart Device: भारतात बहुतांश घरांमध्ये स्वयंपाकासाठी LPG गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. ही सुविधा सोयीची असली तरी, त्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. अनेकदा छोट्या निष्काळजीपणामुळे गॅस गळतीसारख्या समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे गंभीर अपघात होऊ शकतात. त्यामुळेच घराची सुरक्षितता वाढवण्यासाठी काही स्मार्ट उपकरणे अत्यंत उपयुक्त ठरतात.2 / 5 स्मार्ट गॅस सेन्सर हा आधुनिक आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो. हे उपकरण 24 तास हवेमधील गॅसची पातळी तपासत असते. गॅसची पातळी वाढताच हे उपकरण मोठ्या आवाजात अलार्म वाजवते आणि घरातील लोकांना सतर्क करते. काही प्रगत सेन्सर मोबाईलवर रिअल-टाइम अलर्ट देखील पाठवतात. त्यामुळे तुम्ही घराबाहेर असतानाही गॅस गळतीची माहिती मिळू शकते आणि वेळेत योग्य उपाययोजना करता येतात.3 / 5 कमी बजेटमध्ये सुरक्षिततेसाठी गॅस डिटेक्टर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बाजारात उपलब्ध असलेली अनेक उपकरणे LPG सोबत PNG आणि CNG गॅसची गळतीही ओळखू शकतात. गॅस गळती होताच हे उपकरण जोरात सायरन वाजवते, त्यामुळे धोका त्वरित लक्षात येतो. हे वापरणे देखील सोपे आहे. फक्त स्विच बोर्डला जोडले की, उपकरण काम सुरू करते.4 / 5 घरात LPG सिलेंडर असल्यास साध्या रेग्युलेटरऐवजी स्मार्ट रेग्युलेटर वापरणे अधिक सुरक्षित ठरू शकते. या उपकरणामध्ये ऑटो-कट फीचर असते. गॅस गळती किंवा पाइपमध्ये बिघाड झाल्यास हे उपकरण लगेच गॅस पुरवठा बंद करते. काही स्मार्ट रेग्युलेटरमध्ये गॅस लेव्हल इंडिकेटरही असतो, ज्यामुळे सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे समजते.5 / 5 तज्ज्ञांच्या मते, ज्या घरांमध्ये गॅस सिलेंडर वापरला जातो, त्या प्रत्येक घरात गॅस डिटेक्शन उपकरण असणे आवश्यक आहे. ही छोटी उपकरणे मोठे अपघात टाळण्यास मदत करतात आणि कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करतात.