CoronaVirus News : फक्त खोकल्याचा आवाजावरून स्मार्टफोन सांगणार तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह; रिसर्चमधून दावा

By सायली शिर्के | Published: October 31, 2020 08:41 AM2020-10-31T08:41:28+5:302020-10-31T09:23:11+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: स्मार्टफोनमार्फत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याची आता माहिती मिळणार आहे. लक्षणं नसलेल्या व्यक्तींची देखील यामुळे माहिती मिळणार आहे. 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अनेक देशात कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे घरामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे.

अनेक जण गेम खेळण्यासाठी, व्हिडीओ पाहण्यासाठी, फोन करण्यासाठी सध्या स्मार्टफोनचा अधिक वापर करत आहे. मात्र आता स्मार्टफोनच्या मदतीने कोरोनाची देखील माहिती मिळणार आहे. 

स्मार्टफोनमार्फत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याची आता माहिती मिळणार आहे. लक्षणं नसलेल्या व्यक्तींची देखील यामुळे माहिती मिळणार आहे. 

फक्त खोकल्याच्या आवाजावरून कोरोना झाला आहे की नाही हे समजणार आहे. संशोधकांनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) च्या मदतीने एक मॉडेल विकसित केलं असून त्यामध्ये लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना ओळखण्याची देखील क्षमता आहे. 

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनमध्ये विकसित करण्यात आलेलं तंत्रज्ञान केवळ खोकल्याच्या आवाजावरून एखादी व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे सांगतं. 

कोरोना चाचणीसाठी येणारा खर्च हा अधिक आहे. तसेच चाचणीचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे समजण्यासाठीही बराच वेळ लागतो. मात्र या तंत्रज्ञानामुळे आता कोरोना चाचणीचा रिपोर्ट हा स्मार्टफोनवर एका अ‍ॅपच्या माध्यमातून मिळेल. 

अमेरिकेतील मॅसात्सूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी (Massachusetts Institute of Technology - MIT) कोरोना टेस्टसाठी एक असं आर्टिफिशिअल इंटेलेजन्स मॉडेल तयार केलं आहे. 

एआय (AI) मॉडेलच्या माध्यमातून फक्त खोकल्याच्या आवाजातून एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही हे समजू शकतं. आयईईई जर्नल ऑफ इंजिनीअरिंग इन मेडिसीन अँड बायोलॉजीमध्ये या मॉडेलबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

तज्ज्ञांच्या मते कोरोनाचा खोकला आणि सामान्य खोकला याच्या आवाजात फरक आहे. हा आवाज फक्त ऐकण्यावरून समजणार नाही. मात्र (AI) मॉडेल ओळखू शकतं. त्यामुळे लक्षणं नसलेल्या रुग्णांच्या आवाजावरून त्यांच्या कोरोनाचं निदान होऊ शकतं.

लोकांनी वेब ब्राऊझर, सेलफोन आणि लॅपटॉपच्या माध्यमातून रेकॉर्ड केलेला आपला आवाज संशोधकांना पाठवला. खोकला आणि आवाजाचे जवळपास दहा हजार नमुन्यांचा वापर करून हे एआय मॉडेल विकसित केलं. 

मॉडेलची चाचणी घेण्यात आली तेव्हा कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 98.5 टक्के लोकांचं आणि कोरोनाची लक्षणं नसलेल्या 100 टक्के लोकांचं निदान या एआय मॉडेलनं केलं आहे.

संशोधक या एआय मॉडेलमार्फत अ‍ॅप विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून हा अ‍ॅप लोकांना स्मार्टफोमध्ये वापरता येईल. त्यामुळे फक्त खोकून ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाही हे समजण्यास मदत होणार आहे. 

कोरोनाला रोखण्यासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे. याच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने आणि कमी कालावधीत टेस्ट करणं शक्य होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

जगभरात कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रिसर्चमधून कोरोनाबाबतची नवनवीन माहिती समोर येत आहे. 

Read in English