'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:17 IST2025-07-07T11:53:52+5:302025-07-07T12:17:12+5:30

Google Pixel 6a Free Battery Replacement: गुगल कंपनी स्मार्ट फोन वापरकर्त्यांना ८५०० रुपये का देत आहे? या प्रश्नाचे उत्तर सर्वांना जाणून घ्यायचे आहे.

गुगल कंपनी स्मार्ट फोन वापरकर्त्यांना ८५०० रुपये का देत आहे? या प्रश्नाचे उत्तर सर्वांना जाणून घ्यायचे आहे. गुगलच्या 'Pixel 6a' या स्मार्टफोन वापरकर्त्यांकडून हा फोन जास्त गरम होण्याबाबत आणि बॅटरीच्या कामगिरीबाबत सतत तक्रारी आल्यानंतर कंपनी बॅटरी परफॉर्मन्स प्रोग्राम सुरू करणार आहे.

या प्रोग्राम अंतर्गत, कंपनी एकतर बॅटरी मोफत बदलून देईल किंवा तुम्हाला भरपाई म्हणून १०० डॉलर्स (८५०० रुपये) दिले जातील. 'Pixel 6A'ची बॅटरी कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि ती जास्त गरम होण्याचा धोका कमी करण्यासाठी कंपनी उद्यापासून, म्हणजे ८ जुलैपासून अँन्ड्रॉईड १६ चे अपडेट देखील लाँच करेल.

गुगल कंपनीचा 'Pixel 6a' वापरणारे सर्व वापरकर्ते कंपनीच्या अधिकृत सेवा केंद्रात जाऊन आपल्या फोनची बॅटरी बदलून घेऊ शकतात. मात्र, ज्यांना आपल्या फोनची बॅटरी बदलायची नाही ते १०० किंवा १५० डॉलर्सचा (अंदाजे ८५०० ते १२८०० रुपये) गुगल स्टोअर क्रेडिट पर्याय निवडू शकतात.

तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी, कंपनीच्या सपोर्ट पेजला भेट द्या. या पेजवर गेल्यानंतर, खाली अलेल्या कन्फर्म बटणावर टॅप करा, पुढील पेजवर तुम्हाला फोनचा 'IMEI' नंबर टाकावा लागेल. यानंतर, डिव्हाइसशी लिंक केलेला ईमेल आयडी टाका आणि तो सबमिट करा.

मात्र, काही स्थानिक नियमांमुळे, रोख पेमेंट सुविधा सर्व देशांमध्ये उपलब्ध होणार नाही. पेमेंट कंपनी तुम्हाला ती थर्ड पार्टी पेओनरद्वारे प्रदान करेल, ज्यासाठी वापरकर्त्यांकडून आयडी प्रूफ आणि पॅन कार्ड सारखे तपशील मागितले जाऊ शकतात. गुगलने म्हटले आहे की, अंतिम रक्कम दैनिक विनिमय दरावर अवलंबून असेल.

गुगलने स्पष्ट केले आहे की, एखाद्या द्रवपदार्थामुळे किंवा फोनच्या बाहेरील आवरणाचे नुकसान झाले असेल, तर अशा फोनवर मोफत बॅटरी सेवा मिळणार नाही. याशिवाय, जर फोन वॉरंटी अंतर्गत नसेल आणि स्क्रीन तुटलेली असेल, तर कंपनी तुमच्याकडून सेवा शुल्क आकारेल.

गुगलच्या निवेदनानुसार, बॅटरी रिप्लेसमेंट फीचर २१ जुलै २०२५पासून कॅनडा, अमेरिका, जर्मनी, युनायटेड किंग्डम (यूके), जपान, सिंगापूर आणि भारतातील वॉक-इन रिपेअर सेंटर्समध्ये उपलब्ध असेल.