वनप्लसने नॉर्ड ५ मध्ये १३ सिरीजचा कॅमेरा आणला खरा...; मॅरेथॉन बॅटरी अन् परवडणारी किंमत... कसा वाटला...

By हेमंत बावकर | Updated: July 8, 2025 15:40 IST2025-07-08T15:31:49+5:302025-07-08T15:40:48+5:30

One Plus Nord 5 Marathi Review: नॉर्ड ५ हा फोन आम्ही महिनाभरापासून टेस्ट करत आहोत. मिडरेंजमध्ये आम्हाला हा फोन कसा वाटला? कॅमेरा कसा, प्रोसेसरचा परफॉर्मन्स कसा आहे, बॅटरी किती काळ येते या सर्व गोष्टी आम्ही वापरून पाहिल्या आहेत. चला तर मग...

वनप्लसने आज एकाच दिवशी नॉर्ड सिरीजचे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. दोन्ही फोन हे मध्यम श्रेणीमध्ये लाँच करण्यात आले आहेत. यापैकी नॉर्ड ५ हा फोन आम्ही महिनाभरापासून टेस्ट करत आहोत. मिडरेंजमध्ये आम्हाला हा फोन कसा वाटला? कॅमेरा कसा, प्रोसेसरचा परफॉर्मन्स कसा आहे, बॅटरी किती काळ येते या सर्व गोष्टी आम्ही वापरून पाहिल्या आहेत. चला तर मग...

वनप्लस नॉर्ड ५ मध्ये आम्हाला सर्वाधिक आवडलेली गोष्ट म्हणजे त्याचा कॅमेरा. वनप्लसने १३ सिरीजचा सोनीचा जो सेन्सर वापरला आहे तोच यामध्ये देखील दिला आहे. आता किंमत म्हणाल तर जवळपास निम्मी आहे. एवढ्या किंमतीत वनप्लसने एक चांगला कॅमेरा देण्याचा प्रयत्न केला आहे. रात्रीच्या अंधारातही, कमी लाईटमध्येही हा रिअर कॅमेरा चांगले फोटो घेत होता.

सेल्फी कॅमेरा देखील खूप चांगला आहे. आम्ही रिअर आणि सेल्फी कॅमेराने काही फोटो क्लिक केले आहेत. कोणत्याही ३० हजारांच्या किंमतीच्या श्रेणीतील हा सर्वात चांगला कॅमेरा आम्हाला वाटला. पाठीमागे सोनीचा ५० मेगापिक्सल एलवायटी ७०० हा सेन्सर देण्यात आला आहे. दुसरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी देखील ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो रात्रीच्या फोटोंसाठी डिझाईन केलेला आहे.

One Plus Nord 5 ची दुसरी बाजू म्हणजे त्याचा प्रोसेसर, यामध्ये स्नॅपड्रॅगन ८एस जेन ३ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. मिडरेंजसाठी किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी ठीक आहे. बीजीएमआय, फ्री फायरसारखे गेम खेळणाऱ्यांसाठी देखील ठीक आहे. गेम खेळताना फोन जास्त गरम होत नाही. एका अॅप वरून दुसऱ्या अॅपवर जाणे एकदम स्मूथ आहे. काही वेळा कालनिर्णय, हॉटस्टार सारख्या अॅप ओपन होत नव्हती. पुढील अपडेटमध्ये या समस्या दूर होतील अशी अपेक्षा आहे.

डिस्प्लेबाबत सांगायचे झाले तर वनप्लसचा हा पहिला असा फोन आहे जो १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि अमोल्ड आहे. 6.83-inch चा हा डिस्प्ले आहे. ज्यावर आम्ही तासंतास व्हिडीओ पाहिले. Corning Gorilla Glass 7i ची सुरक्षा देण्यात आली आहे. अमोल्ड डिस्प्ले असल्याने चांगला आहे. या फोनचे स्पीकर मोठ्या आवाजावेळी थोडे कर्कश वाटले. परंतू, कमी आवाजात काही समस्या वाटली नाही.

सध्या मोठी बॅटरी देण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. या फोनमध्येही ६८०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. परंतू फोन तेवढा वजनी वाटला नाही. जवळपास अडीच दिवस बॅटरी आरामात येत होती. आम्ही यावर काही दिवस वेबसिरीजसारखे मोठमोठाले व्हिडीओ देखील पाहिले आहेत. गेमही खेळून पाहिले आहेत. खूप वापर करणाऱ्यांना आरामात दीड-दोन दिवस या फोनची बॅटरी येऊ शकते.

या फोनचा लुक साधा सिंपल आहे. मार्बल सँड थोडासा हातात घेतल्यावर स्लिपरी वाटतो. परंतू, बॅक कव्हर केस घालणे सर्वाधिक सुरक्षित उपाय आहे. खालच्या बाजुला स्पिकर ग्रिल, मध्ये टाईप सी पोर्ट आणि सिम कार्ड ट्रे आहे. डाव्या बाजुला एक बटन दिलेले आहे, ज्यावरून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी सेट करून वापरू शकता. उजव्या बाजुला आवाज कमी जास्त आणि स्विच ऑन-ऑफ बटन आहे.

कॉलिंगवेळी एक तुम्हाला एआय ट्रान्सलेट फिचर देण्यात आले आहे. ज्याद्वारे तुम्ही रिअल टाईममध्ये दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेशन ऐकू बोलू शकता. यामध्ये डीप एआय इंटिग्रेशन आहे. एआय कॉल असिस्टंट आणि ट्रान्सलेशनचा समावेश आहे.

वनप्लसच्या या फोनची किंमत 8+256GB ची 29,999 रुपये, 12+256GBसाठी 32,999 रुपये आणि 12+512GB साठी 35,999 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. हा फोन ९ जुलैपासून सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीला उपलब्ध असणार आहे. Marble Sands, Phantom Grey व Dry Ice अशा तीन रंगात हा फोन उपलब्ध आहे.

कॅमेरासाठी हा फोन ३० हजारांच्या किंमतीत चांगला पर्याय आहे. परफॉर्मन्स बाबतही ठीक आहे. काही अॅप यावर थोडी काम करत नव्हती, परंतू आपल्या रोजच्या वापरातील अॅपला काहीही समस्या नव्हती. या फोनच्या किंमती पाहता ज्यांना ४०-५० हजाराचे फोन घेणे शक्य नाहीय त्यांच्यासाठी एक पावरफुल, जास्त वापर असणाऱ्यांसाठी चांगली बॅटरी देणारा, जास्त प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय वनप्लसने दिला आहे.