तब्बल 60 कोटीवेळा डाऊनलोड झालेली चीनी अ‍ॅप्स गुगलने केली बंद; हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 12:46 PM2019-04-29T12:46:50+5:302019-04-29T12:52:37+5:30

चीनी अ‍ॅप TikTok वर बंदी आणण्याचे भारतात विचाराधीन असताना गुगलने मोबाईलधारकांच्या सुरक्षेसाठी चीनची आणखी 46 अ‍ॅप हटविली आहेत. धक्कादायक म्हणजे ही सर्व अॅप चायनिज डेव्हलपर DO Global ने बनविलेली आहेत. या सर्व अॅप्सना तब्बल 60 कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आले होते. या कंपनीची गुगलवर 100 अॅप होती. यापैकी 46 अ‍ॅप हटविण्यात आली आहेत.

बझफीडच्या एका अहवालानुसार DO Global च्या अ‍ॅप्सबद्दल अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. यामध्ये युजर्सना फसविले जात असल्याच्या तक्रारींची संख्या जास्त होती. ही अॅप बंद केल्यानंतरही फोनमध्ये सुरु राहत होती. या अॅपमध्ये खोट्या जाहिरातींच्या लिंक दिल्या जात होत्या. ज्या अॅप्स बंद केल्यानंतरही स्क्रीनवर येत होत्या. याचा अर्थ ही अ‍ॅप बॅकग्राऊंडला सुरु राहत होती.

गुगलने इंग्रजी तंत्रज्ञान वेबसाईटला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की, कंपनी युजरच्या सुरक्षेसाठी काही दिवसांच्या अंतराने अ‍ॅप्सची तपासणी करते. यामध्ये संशयित किंवा दोषी आढळणारी अ‍ॅप डिलीट केली जातात.

महत्वाचे म्हणजे गुगलने ही पहिलीच कारवाई केलेली नाही. असे अनेकदा केले जाते. याआधी गुगलने omni Cleaner, रैम मास्टर, स्मार्ट कूलर, टोटल क्लिनर आणि एसाईट फ्रॉम सेल्फी कॅमेरा सारखे अ‍ॅप प्लेस्टोअरवरून डिलिट केले आहेत.