जुने फोन परत घेण्यामागे कंपन्यांचा मोठा फायदा! 'ई-कचऱ्यातून' 'सोने' मिळवण्याची ही आहे प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 17:05 IST2025-10-21T16:57:52+5:302025-10-21T17:05:43+5:30
जुने स्मार्टफोन केवळ कचरा नसतात, तर ते आधुनिक तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या दुर्मिळ आणि मौल्यवान धातूंचा एक महत्त्वाचा स्रोत आहेत

स्मार्टफोन कंपन्या जेव्हा एक्सचेंज ऑफरमध्ये ग्राहकांकडून जुने फोन स्वीकारतात, तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो की या जुन्या उपकरणांचे नेमके काय होते. केवळ 'ई-कचरा' म्हणून टाकून दिले जातात की त्यांचा काही उपयोग होतो? वास्तविकता अशी आहे की, हे जुने फोन कंपन्यांसाठी 'पैसे कमावण्याच्या खाणी' ठरतात, कारण त्यामध्ये सोने, तांबे, चांदी आणि इतर अनेक मौल्यवान धातू लपलेले असतात.
स्मार्टफोन कंपन्या किंवा त्यांच्या भागीदार कंपन्या या जुन्या फोन्सचा उपयोग प्रामुख्याने दोन पद्धतीने करतात. एक म्हणजे नूतनीकरण आणि पुनर्वापर, दुसरे म्हणजे धातूंचे निष्कर्षण आणि पुनर्प्रक्रिया. जे फोन चांगल्या स्थितीत असतात, त्यांचे नूतनीकरण करून ते पुन्हा विकले जातात. दुरुस्त केलेले आणि नूतनीकरण केलेले फोन कमी किंमतीत विकले जातात. हे फोन अनेकदा विकसनशील देशांमध्ये किंवा कंपनीच्या वॉरंटी अंतर्गत बदली फोन म्हणून वापरले जातात.
अतिशय खराब झालेले किंवा दुरुस्त करण्यास परवडणारे नसलेले फोन थेट रिसायकलिंगसाठी पाठवले जातात. या प्रक्रियेला अर्बन मायनिंग म्हणतात. फोनचे लहान तुकडे केले जातात आणि त्यानंतर विशेष रासायनिक आणि वैज्ञानिक प्रक्रियांचा वापर करून त्यातील धातू वेगळे केले जातात. या प्रक्रियेतून काढलेले सोने, तांबे, चांदी, पॅलेडियम यांसारखे मौल्यवान धातू नवीन उत्पादने बनवण्यासाठी पुन्हा कच्चा माल म्हणून वापरले जातात.
फोनच्या सर्किट बोर्डवर (मदरबोर्ड), कनेक्टर्सवर आणि प्रोसेसरच्या पिन्सवर सोन्याचा अतिशय पातळ थर चढवलेला असतो. सोने उत्कृष्ट विद्युत कंडक्टर असल्याने वीजेचा प्रवाह सुरळीत राहतो. सोन्यावर गंज चढत नाही, ज्यामुळे दीर्घकाळ कनेक्शन टिकाऊ राहते.
तांबे हे वायरिंग, मोटर आणि सर्किटमधील अनेक इलेक्ट्रॉनिक घटकांमध्ये वापरले जाते. सोन्याप्रमाणेच तांबे देखील चांगले विद्युत सुचालक आहे आणि ते स्वस्त असल्याने मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तर चांदी, ॲल्युमिनियम, पॅलेडियम हे सर्व फोनची कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी वापरले जातात.
एका स्मार्टफोनमधून साधारणपणे १५ ते ५० मिलीग्राम इतकेच सोने मिळते. १ ग्रॅम सोने काढण्यासाठी अंदाजे ३५ ते ४१ जुने स्मार्टफोन रिसायकल करावे लागतात. तर एका फोनमध्ये सोन्यापेक्षा तांबे आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त असते. ही धातू काढण्याची प्रक्रिया अत्यंत जटिल आणि महागडी असते. म्हणूनच, हे काम केवळ मोठ्या ई-वेस्ट रिसायकलिंग युनिट्समध्येच सुरक्षितपणे केले जाते. सर्वसामान्य लोक हे घरी करू शकत नाहीत.
फोनचे मुख्य सर्किट बोर्ड आणि उर्वरित भाग (प्लास्टिक वगळता) एका मोठ्या श्रेडर मशीनमध्ये टाकले जातात. त्यात फोनचे लहान, एकसमान तुकडे केले जातात. या तुकड्यांवरून चुंबक फिरवून लोह आणि पोलाद यांसारख्या धातूंना वेगळे केले जाते. उरलेले तुकडे एका विशेष भट्टीमध्ये अतिशय उच्च तापमानावर वितळवले जातात. धातू वितळून द्रव रूपात जमा होतात. यातून निकेल, शिसे यांसारखे कमी किमतीचे धातू वेगळे काढले जातात. आता उरलेल्या मिश्रणात तांबे, सोने आणि चांदीचे प्रमाण जास्त असते.
तांब्यापासून सोने आणि चांदी वेगळे करण्यासाठी 'इलेक्ट्रो रिफायनिंग' प्रक्रिया वापरली जाते. तांब्याच्या मिश्रणाचे इलेक्ट्रोलाइटिक बाथमध्ये विद्युत अपघटन केले जाते. या प्रक्रियेत तांबे शुद्ध स्वरूपात जमा होते आणि सोने व चांदी ऍनोड स्लज रूपात खाली जमा होते. ऍनोड स्लजवर नायट्रिक ऍसिड किंवा एक्वा रेगिया सारख्या शक्तिशाली रसायनांची प्रक्रिया केली जाते. या रसायनांमुळे सोने आणि चांदी वेगळी होते.
स्मार्टफोन कंपन्या अशाने श्रीमंत होत नाहीत तरीही जुन्या फोन्सचा योग्य वापर करतात. एक्सचेंज केलेले जुने फोन एकतर पुन्हा बाजारात येतात किंवा त्यातील सोने आणि तांबे यांसारख्या मौल्यवान धातू बाजूला करुन पुन्हा वापरले जाते. यामुळे ई-कचरा कमी होतो आणि नैसर्गिक संसाधनांवरचा ताणही कमी होतो. त्यामुळे, तुमचा जुना फोन कंपनीला देणे किंवा योग्य रिसायकलिंग कंपनीला देणे हे पर्यावरणासाठी सर्वात योग्य पाऊल आहे.