चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 19:15 IST2026-04-12T19:06:27+5:302026-04-12T19:15:24+5:30

९९% लोक याकडे दुर्लक्ष करतात, मात्र हाच कोड तुमच्या फोनची आणि तुमची सुरक्षा ठरवत असतो.

स्मार्टफोनसोबत चार्जर मिळणे बंद झाल्यामुळे आपण बाजारातून कोणताही स्वस्त चार्जर विकत घेतो. पण चार्जरच्या मागे 'R' अक्षराने सुरू होणारा एक विशिष्ट कोड असतो. ९९% लोक याकडे दुर्लक्ष करतात, मात्र हाच कोड तुमच्या फोनची आणि तुमची सुरक्षा ठरवत असतो.

हा 'R' कोड म्हणजे BIS (Bureau of Indian Standards) नोंदणी क्रमांक आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी सरकारी सुरक्षा मानके पूर्ण केली आहेत की नाही, याचे हे अधिकृत प्रमाणपत्र असते. ज्या चार्जरवर हा कोड असतो, तोच खरा आणि सुरक्षित मानला जातो.

बाजारात सध्या स्वस्त आणि बनावट चार्जरचा सुळसुळाट आहे. बनावट चार्जरवर एकतर हा कोड नसतो किंवा तो चुकीचा छापलेला असतो. केवळ हा कोड पाहून तुम्ही मूळ ब्रँडचा सुरक्षित चार्जर आणि रस्त्यावर मिळणारा घातक चार्जर यातील फरक सहज ओळखू शकता.

प्रमाणित 'R' कोड असलेला चार्जर शॉर्ट सर्किट, ओव्हरहीटिंग आणि विजेचा धक्का लागण्यापासून तुमचे संरक्षण करतो. या चार्जरची अंतर्गत रचना अशा प्रकारे केली जाते की, वीज प्रवाहामध्ये चढ-उतार झाला तरी तुमच्या महागड्या स्मार्टफोनच्या बॅटरीला कोणतीही इजा होत नाही.

चार्जरवरील कोड खरा आहे की खोटा, हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता. 'BIS Care' नावाचे अधिकृत सरकारी ॲप डाऊनलोड करा आणि त्यात चार्जरवरील 'R' क्रमांक टाका. जर चार्जर खरा असेल, तर निर्मात्याचे नाव आणि गुणवत्तेची सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर क्षणात दिसेल.

पुढच्या वेळी चार्जर खरेदी करताना केवळ त्याची किंमत किंवा लूक पाहू नका. चार्जरवरील 'R' कोड तपासूनच पैसे खर्च करा. एक चुकीचा किंवा बनावट चार्जर तुमच्या फोनचा स्फोट घडवू शकतो किंवा बॅटरी कायमची निकामी करू शकतो, त्यामुळे नेहमी सावध राहा.