Coronavirus : रिलायन्स MyJio ने आणलं नवं टूल, आता घरबसल्या ओळखा कोरोनाची लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 04:31 PM2020-03-24T16:31:57+5:302020-03-24T17:06:38+5:30

Coronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज़ लिमिटेडने #CoronaHaaregaIndiaJeetega ही एक मोहिम सुरू केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र आता घरबसल्या कोरोनाची लक्षण समजण्यास मदत होणार आहे.

रिलायन्सच्या MyJio अ‍ॅपने एक नवीन टूल आणलं आहे. MyJio Coronavirus Tool असं या टूलचं नाव असून ते युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज़ लिमिटेडने #CoronaHaaregaIndiaJeetega ही एक मोहीम सुरू केली आहे. याच्या माध्यमातून रिलायन्स जिओने MyJio App मध्ये अनेक नवीन फीचर्स अ‍ॅड केले आहेत.

रिलायन्स जिओने MyJio Coronavirus Tool लाँच केले आहे. याच्या मदतीने युजर्सना घरच्या घरी कोरोनाच्या लक्षणांची माहिती मिळवता येणार आहे. MyJio अ‍ॅपसह Jio.comया वेबसाईटवरूनही हे टूल वापरता येणार आहे.

कोरोनाबाबतची संपूर्ण माहिती ही यामध्ये देण्यात आलेली आहे. लक्षणे, सल्ला, कोरोनाग्रस्तांचा आकडा अशी विविध माहिती देण्यात आलेली आहे.

रिलायन्स जिओच्या या अ‍ॅपमध्ये काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्याची उत्तर द्यावी. टूलच्या मदतीने मूल्यांकन देण्यात येईल. त्यानंतर निदान केले जाईल.

युजर्सनी दिलेल्या उत्तरांच्या आधारावर जिओ कोरोना व्हायरस टूल युजर्सना कमी धोका, मध्यम धोका आणि जास्त धोका असे लेबल देतील. त्याचबरोबर या संबंधित मार्गदर्शनही करण्यात येईल.

कमी धोका असलेल्या लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर मध्यम धोका असलेल्यांना घरीच आयसोलेशनमध्ये राहावे, घरातील कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये, असे सांगण्यात येत आहेत.

जास्त धोका असलेल्या लोकांनी स्थानिक प्रशासनाला यासंबंधी माहिती देऊन त्वरित आपली चाचणी करून घ्यावी. या सेवेमुळे लोकांना घरच्या घरी कोरोनाची लक्षणे समजतील.

कोरोना रुग्णांचे निदानही लवकर होईल आणि रुग्णालयांमधील गर्दीही कमी होईल. याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल.

COVID-19 या डायग्नोस्टिक टूलचा लाभ घेता यावा यासाठी, जिओ ग्राहक नसलेले युजर्स ही वेबसाईटच्या माध्यमातूनही ही सेवा वापरू शकतात.

जिओची ही सेवा विनामुल्य असून सध्या केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. लवकरच हिंदी आणि इतर भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे.