नकली नोटा झटक्यात तपासा; आरबीआयने लाँच केले अॅप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 13:03 IST2020-01-02T12:55:33+5:302020-01-02T13:03:39+5:30

नोटाबंदी नंतरही भारतीय अर्थव्यवस्थेला बनावट नोटांनी पोखरलेले आहे. यामुळे देशाचे नुकसान होतेच, पण ज्याच्याकडे या नोटा सापडतात त्याचेही मोठे नुकसान होते.
तुमच्याकडे ही नोट सापडली तर बँक ती जप्त करते. त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळत नाहीत, उलट तुमच्या खिशातील रक्कम टाकावी लागते. या संकटापासून मुक्तीसाठी आरबीआय धावून आली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकतेच एक अंध व्यक्तींसाठी खास मोबाईल अॅप तयार केले आहे. या अॅपच्या मदतीने बनावट नोटा एका फटक्यात ओळखता येणार आहेत. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे.
हे अॅप प्रामुख्याने अंध व्यक्तींसाठी बनविण्यात आले असल्याने तुमच्या हातातील नोट कोणती आहे हे ते अचूक ओळखते आणि त्याचा आकडा, खरी की खोटी हे आवाजाने सांगते.
अॅप इन्स्टॉल करताना तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजी भाषा निवडायची आहे. या भाषेतून ते तुमच्याशी बोलणार आहे. नोटा ओळखलेली हिस्ट्रीही मिळणार आहे.
टॉकबॅकचे सेटिंग ऑन केल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. कोणतीही नोट तुम्हाला रिअर कॅमेरासमोर 5 ते 7 इंचावर ठेवण्यात यावी. यानंतर अॅप तुम्हाला नोटेची रक्कम आकड्यात आणि आवाजात सांगणार आहे.
हे अॅप वापरताना काही समस्याही आढळली आहे. पाचशेची नोट अॅपने झटक्यात ओळखली. पण 20 ची जुनी नोट य़ा अॅपला लगेचच ओळखता येत नव्हती. त्याने कधी 20 रुपये, कधी 5 तर कधी 10 रुपये असल्याचे सांगितले.
तसेच टॉकबॅक ऑन असल्यामुळे स्क्रीनवर दोनदा टॅप करावे लागते. यामुळे मोबाईलची काही फंक्शन वापरता येत नाहीत. अशावेळी सेटिंगमध्ये जाऊन पुन्हा टॉकबॅक बंद करावे लागते.
या लिंकवर जाऊन डाऊनलोड करू शकता.
अँड्रॉईड - https://play.google.com/store/apps/details?id=com.rbi.mani आयफोन - आयओएस 9+ https://apps.apple.com/app/id1491443029 आयओएस 8 https://apps.apple.com/app/id1491441464