सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 17:14 IST2026-04-13T17:05:54+5:302026-04-13T17:14:14+5:30

Ceiling Fan VS Table Fan : खरे तर, दोन्ही पंखे आपापल्या जागी उपयुक्त आहेत. मात्र, तरीही विजेचे बिल आणि वापर यानुसार, योग्य निवड करणे अत्यंत आवश्यक असते.

उन्हाळा सुरू झाला की, घराघरांत गरज भासू लागते ती पंख्यांची. अशा वेळी 'सीलिंग फॅन' घ्यावा की 'टेबल फॅन', असा प्रश्न अनेकांना पडतो. खरे तर, दोन्ही पंखे आपापल्या जागी उपयुक्त आहेत. मात्र, तरीही विजेचे बिल आणि वापर यानुसार, योग्य निवड करणे अत्यंत आवश्यक असते.

कोणत्या पंख्याने बील कमी येईल? - विजेच्या वापराचा विचार करता, सीलिंग फॅनला साधारणपणे ६० ते ८० वॅट एवढी वीज लागते. तर टेबल फॅनसाठी केवळ ३० ते ५० वॅट दरम्यानच वीज लागते. अर्थात टेबल फॅनने विजेची बचत होते.

जर आपण दिवसभर पंखा वापरणार असाल, तर टेबल फॅन तुमच्या वीज बिलात कपात करण्यास मदत करू शकतो. मात्र, सीलिंग फॅन आणि टेबल फॅन यांमध्ये एक महत्वाचा फरक म्हणजे, सिलिंग फॅन मोठ्या जागेत हवा पसरवतो, तर टेबल फॅनची हवा मर्यादित क्षेत्रापर्यंत पसरते.

कूलिंग आणि कव्हरेजमधील फरक सीलिंग फॅन संपूर्ण खोलीत समान हवा पसरवण्यास सक्षम असतो. यामुळे मोठ्या खोल्यांसाठी तो एक उत्तम पर्याय आहे. तर टेबल फॅन एकाच दिशेने वेगाने हवा देतो. छोट्या खोल्या किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी बसण्यासाठी टेबल फॅन अधिक फायद्याचा ठरतो.

पोर्टेबिलिटी आणि सुविधा - टेबल फॅनचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याची 'पोर्टेबिलिटी'. तुम्ही तो सहजपणे स्वयंपाकघर, बालकनी किंवा ऑफिस डेस्क आदी ठिकाणी सहजपणे हलवू शकता. सीलिंग फॅन एकाच ठिकाणी लावावा लागतो.

किंमत आणि देखभाल खर्च - किंमतीचा विचार करता, टेबल फॅन स्वस्त मिळतो आणि त्याला इन्स्टॉलेशनचीही गरज नसते. सीलिंग फॅन थोडे महाग असू शकतात आणि ते बसवण्यासाठी कारागिराची मदत घ्यावी लागते. स्वच्छतेचा विचार करता, उंचीवर असल्याने सीलिंग फॅनची सफाई करणे टेबल फॅनच्या तुलनेत थोडे कठीण असू शकते.

अर्थात, आपल्याला संपूर्ण खोलीसाठी हवा हवी असेल तर, सीलिंग फॅन योग्य ठरतो. तसेच, वैयक्तिक थंडाव्यासह वीज बचतीला प्राधान्य द्यायचे असेल, तर टेबल फॅन उत्तम पर्याय ठरू शकेल.

Ceiling Fan VS Table Fan