Pandharpur : 'आमच्या सभांमध्ये पाऊस आला की विरोधकांना धसकाच बसतो'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 07:29 PM2021-04-13T19:29:34+5:302021-04-13T19:43:11+5:30

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधिकारी आणि विरोधकांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे, त्यातच अवकाळी पाऊस हा सभेतील चर्चेचा विषय बनला आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथील भाजपा उमेदवार समाधान अवताडे यांचा प्रचार करताना पावसातील सभेवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं.

मला आत्ताच खासदार रणजीतसिंह निबाळकर म्हणाले देवेंद्रजी आता पावसात सभा घेण्याच तुमची बारी आहे. पण, आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीसांनी पंढरपूर येथील सभेतून शरद पवार आणि जयंत पाटील यांना टोला लगावला. महाराष्ट्रात ही निवडणूक एक नवीन आचार, विचार आणि मार्ग घेऊन येणार आहे.

एका निवडणुकीने सरकार बदलत नसले तरी, लोकशाहीत सरकारचा दुराचार, भ्रष्टाचार वाढल्यानंतर त्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी मताचा अधिकार सर्वात मोठा असतो, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवरुन गायक आनंद शिंदे यांनी गाण्याच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केले. तसेच सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचाही त्यांनी खरमरीत शब्दात समाचार घेतला.

’’हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पडणार नाय’’, असा टोला आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.

पंढरपूर तालुक्यातील वाकडी व मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे धनंजय मुंडे यांच्या प्रचारसभा संपन्न झाल्या.

मी कच्च्या गुरूचा चेला नाही, असं भारत नाना म्हणायचे, मीदेखील कच्च्या गुरूचा चेला नाही असं म्हणत मुंडेंनी विरोधकांवर टीका केली.

खा. शरद पवार यांच्या पावसाच्या सभेची आठवण सांगत, काल परवा जयंत पाटील यांच्या सभेत पाऊस आला आणि विरोधकांनी त्याचा धसकाच घेतला.

विरोधकांना आमच्या सभांमध्ये पाऊस आला की धसकाच बसतो, अशी मिश्किल टिप्पणी करत धनंजय मुंडेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.