१२.५ कोटींचे घड्याळ, ३९७ हिरे आणि 'वनतारा'ची थीम! डायलवर अनंत अंबानींची मूर्ती आणि सोन्याचा हत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:00 IST2026-01-23T12:48:29+5:302026-01-23T13:00:35+5:30
Opera Vantara Green Camo: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांचा महत्त्वाकांक्षी वन्यजीव संवर्धन प्रकल्प वनतारा आता केवळ जमिनीवरच नाही, तर जागतिक लक्झरी मार्केटमध्येही चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रसिद्ध लक्झरी वॉचमेकर जॅकब अँड कंपनीने या प्रकल्पाला ट्रिब्यूट देण्यासाठी त्यांचे अत्यंत खास ओपेरा वनतारा ग्रीन कॅमो हे घड्याळ २१ जानेवारी रोजी लाँच केले आहे.

या घड्याळाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याचं डायल. हे डायल एखाद्या थिएटरसारखं दिसतं, ज्यामध्ये हाताने बनवलेल्या सूक्ष्म कलाकृती आहेत. घड्याळाच्या आत अनंत अंबानी निळ्या फ्लोरल शर्टमध्ये बसलेले दिसतात.

त्यांच्यासोबत अत्यंत सजीव दिसणारा सिंह आणि बंगाल टायगरच्या सूक्ष्म मूर्ती आहेत. वृत्तानुसार, यामध्ये सोन्याने कोरलेला एक हत्ती आणि त्यावर 'Vantara' असे नाव देखील कोरण्यात आले आहे.

या घड्याळाची किंमत जवळपास १.५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे १२.५ कोटी रुपये आहे. हे घड्याळ एखाद्या दागिन्यापेक्षा कमी नाही. यात २१.९८ कॅरेटचे एकूण ३९७ मौल्यवान खडे जडवण्यात आले आहेत.

'जंगल' लूक देण्यासाठी यात हिरव्या रंगाचे डिमेंटोइड गार्नेट, सावोराइट्स, हिरवे नीलम आणि पांढऱ्या हिऱ्यांचा वापर करून कॅमफ्लाज इफेक्ट देण्यात आला आहे.

हे घड्याळ जॅकब अँड कंपनीच्या प्रसिद्ध 'ओपेरा' कलेक्शनचा भाग आहे. यात एक विशेष म्युझिक बॉक्स बसवण्यात आला आहे. बटन दाबताच त्यातून संगीत वाजते आणि घड्याळाचे संपूर्ण डायल फिरू लागते. घड्याळ निर्मितीच्या जगात हे तंत्रज्ञान अत्यंत गुंतागुंतीचे मानले जाते.

जेकब अँड कंपनीने यापूर्वी भारत आणि अंबानी कुटुंबाशी संबंधित खास घड्याळे तयार केली आहेत. कंपनीने राम जन्मभूमी एडिशन घड्याळ देखील सादर केले, जे अनेक प्रमुख सेलिब्रिटींनी घातले होते.

गुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्सच्या रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये ३,५०० एकरवर पसरलेले 'वनतारा' हे जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव पुनर्वसन केंद्रांपैकी एक आहे. तिथे १.५ लाखांहून अधिक प्राणी राहतात. या केंद्रात १ लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेले प्राण्यांचे खास रुग्णालय आहे, जिथे हत्तींसाठी एमआरआय आणि सीटी स्कॅन सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

















