दुबईत तयार होतंय १५६ खोल्यांचं भव्य फ्लोटिंग हॉटेल; हेलिपॅडसह अत्याधुनिक सुविधांनी सज्ज, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 04:26 PM2022-01-04T16:26:15+5:302022-01-04T16:34:17+5:30

Dubai Floating Hotel: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफासह मानवनिर्मिती बेटांसाठी जगात प्रसिद्ध असलेल्या दुबईनं आता नवा विक्रम करण्याची तयारी केली आहे.

दुबईत आता एक भव्य फ्लोटिंग हॉटेल म्हणजेच पाण्यावर तरंगणारं हॉटेल तयार केलं जात आहे. या हॉटेलचं विशेष आकर्षण म्हणजे गरज पडल्यास या हॉटेलमधील लग्जरी व्हिलाचं बोटीत रुपांतर करता येणार आहे. असे एकूण १२ सूट्स उपलब्ध असणार आहेत.

केम्पिंस्की फ्लोटिंग पॅलेस असं हॉटेलचं नाव असणार आहे. मुख्य हॉटेलमध्ये एकूण १५६ खोल्या असणार आहेत. तसंच हेलिकॉप्टर उतरण्यासाठी एक हेलिपॅड देखील तयार करण्यात आलं आहे. याशिवाय रेस्टॉरंट, बार, स्विमिंग पूल आणि एक स्पा देखील असणार आहे.

हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना स्पीड बोटनं हॉटेलपर्यंत नेण्याची सुविधा देण्यात येते. ज्यांना हेलिकॉप्टरनं हॉटेलपर्यंत पोहोचायचं आहे त्यांच्यााखासाठी खास हेलिकॉप्टरची देखील सुविधा हॉटेलनं उपलब्ध करून दिली आहे. तसंच हॉटेलमध्ये यॉट पार्किंगची देखील सुविधा दिली जाणार आहे.

सोशल मीडियावर या हॉटेलचे फोटो आता व्हायरल होऊ लागले आहेत. याच एक हॉटेलचं छत देखील काचेचं असल्याचं दिसून येत आहे. एक खासगी स्विमिंग पूल आणि दोन मोठे रुफटॉप पूल देखील दिसत आहेत. हॉटेलच्या आजूबाजूला एकूण १२ ओव्हरवॉटर सूट्स असणार आहेत. यात 1BHK पासून 4 BHK पर्यंतचे पर्याय उपलब्ध असणार आहेत.

१२ आलिशान सूट्सच्या छतावर इन्फिनिटी पूल देखील असणार आहेत. विशेष म्हणजे हे लग्जरी सूट्स पाण्यात चारही बाजूंना फिरण्यासाठी सक्षम असणार आहे. कारण यात मोटार बसवण्यात आली आहे. म्हणजेच हे सूट्स मुख्य हॉटेलच्या इमारतीपासून वेगळे होऊ शकतात आणि तुम्ही सूट्समध्ये बसल्या बसल्या एक फेरफटका मारुन येऊ शकता.

लग्जरी सूट्समध्ये थांबण्याची कुणाची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी खास वेगळे कर्मचारी सूट्समध्ये उपलब्ध असणार आहे. दरम्यान या सूट्सचं एका दिवसाचं भाडं किती असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सध्या या हॉटेलची दुबईतील सीगेट शिपयार्डमध्ये निर्मिती केली जात आहे आणि २०२३ पर्यंत हॉटेलचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे.

"आम्हाला विश्वास आहे की आमचं हे पाण्यावर तरंगणारं हॉटेल लवकरच दुबईतील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक होईल", असं सीगेट शिपयार्डचे सीईओ आणि संस्थापक मोहम्मद एल बहरावी यांनी सांगितलं.