कपाट उघडताच कपड्यांचा ढीग अंगावर पडतो ? 'या' मिनिटभराच्या इन्स्टंट ट्रिकने कपाट राहील कायम नीटनेटकं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2026 15:14 IST2026-04-01T20:00:00+5:302026-04-02T15:14:23+5:30

small wardrobe organization tips : wardrobe organization ideas for small space : clothes storage ideas for small wardrobe : कपड्यांची घडी विस्कटू नये आणि कपाट नेहमी आवरलेलं दिसावं, यासाठी ७ स्मार्ट ट्रिक्स...

कपाट उघडताच कपड्यांचा ढीग अंगावर कोसळणं ही समस्या जवळपास प्रत्येकाच्या घरात दिसतेच. कपाट कितीही वेळा आवरलं तरी दोन दिवसांत पुन्हा जसेच्या तसे होते, हा आपल्यापैकी अनेकांचा रोजचा अनुभव आहे. घाईघाईत एखादा ड्रेस किंवा टी-शर्ट काढायला जातो आणि साचवलेला सगळा पसारा बाहेर येतो. मग पुन्हा ते कपडे नीट लावून ठेवण्याचा प्रचंड कंटाळा येतो. पण कपाट आवरणे हे तासनतास चालणारे काम नाही, तर ते एका 'सिस्टीम'चा भाग आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने कपड्यांची मांडणी केली, तर ५ मिनिटांत तुम्ही तुमचं कपाट एखाद्या शोरूमसारखं नीटनेटके सेट करू शकता( clothes storage ideas for small wardrobe).

कपड्यांची घडी विस्कटू नये आणि कपाट नेहमी आवरलेलं दिसावं....कपडे नीट, सुटसुटीत आणि जागा वाचवून कसे ठेवायचे याच्या काही इन्स्टंट आणि उपयुक्त टिप्स पाहूयात...ज्यामुळे कपाट कायम नीटनेटके राहील.

सगळ्यात आधी कपाटांतून सर्व कपडे बाहेर काढा. यामुळे तुम्हाला हे समजण्यास मदत होईल की तुमच्याकडे नेमके किती कपडे आहेत आणि कोणते महत्त्वाचे वापरण्यायोग्य आहेत. जुने किंवा बऱ्याच काळापासून न वापरलेले कपडे वेगळे करा.

आपले कपाट ऋतूंनुसार सेट करा. जो ऋतू सुरू आहे त्याच ऋतूचे कपडे समोर ठेवा. इतर कपड्यांना मोठ्या ऑर्गनायझरमध्ये घालून बेड बॉक्समध्ये किंवा वरच्या शेल्फमध्ये ठेवून द्या. यामुळे कपाटात आवश्यक कपड्यांसाठी पुरेशी जागा मिळेल.

कपड्यांचे वर्गीकरण करा. ऑफिसचे कपडे, घरातले कपडे आणि सण - समारंभाचे कपडे यांचे वेगवेगळे कप्पे करा. जे कपडे तुम्ही रोज वापरता ते हाताशी, डोळ्यांना दिसतील असे ठेवा आणि क्वचित लागणारे कपडे वरच्या कप्प्यात ठेवा.

कपडे एकावर एक रचण्याऐवजी ते उभ्या पद्धतीने (फायलींसारखे) लावून ठेवा. यामुळे तुम्हाला खालचा कपडा काढताना वरच्या कपड्यांची घडी विस्कटण्याची भीती राहत नाही आणि एका नजरेत सगळे कपडे दिसतात.

अंतर्वस्त्रे, मोजे, रुमाल किंवा स्कार्फ यांसारख्या छोट्या गोष्टींसाठी छोट्या बास्केटचा किंवा 'ड्रॉवर डिव्हायडर्स'चा वापर करा. यामुळे या गोष्टी मोठ्या कपड्यांमध्ये मिसळत नाहीत आणि पसारा कमी होतो.

ज्या कपड्यांना घड्या पडतात किंवा जे कपडे कपाटात जागा जास्त घेतात (उदा. साड्या, कोट, कुर्ती), ते हँगरला अडकवून ठेवा. यामुळे कपाटाच्या खालच्या बाजूला जागा मोकळी राहते.

कपाटात जागा टिकवून ठेवण्यासाठी हा नियम अतिशय फायदेशीर ठरतो. जेव्हा तुम्ही एखादा नवीन कपडा खरेदी करता, तेव्हा कपाटातील जुना किंवा न वापरला जाणारा एक कपडा बाहेर काढून टाका. यामुळे कपाटात कधीच अनावश्यक गर्दी होत नाही.