कायम खुश राहणाऱ्या लोकांच्या ७ सवयी! नेहमी आनंदी राहण्यासाठी असं वेगळं काय करतात - पाहा सोपं गणित...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 20:00 IST2026-04-07T20:00:00+5:302026-04-07T20:00:07+5:30

simple habits to stay happy : habits of happy people you should follow daily : नेहमी आनंदी, खुश राहणाऱ्या लोकांच्या अशा खास सवयी कोणत्या, पाहा तुमचा आनंद तुमच्याच हाती...

आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात कायम आनंदी राहणं अनेकांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. कामाचा ताण, वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे मनःशांती हरवलेली दिसते. पण काही लोक असे असतात, जे कोणत्याही परिस्थितीत हसतमुख राहतात आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात.

आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात, ज्यांच्या चेहऱ्यावर सदैव हास्य आणि आनंद असतो. परिस्थिती कशीही असो, हे लोक कमालीचे शांत आणि सकारात्मक दिसतात. अशा लोकांना पाहून आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की, "यांच्या आयुष्यात काहीच समस्या नसतील का?" किंवा "हे लोक कायम इतके खुश कसे राहू शकतात?" खरंतर, आनंद हा बाह्य परिस्थितीपेक्षा आपल्या आंतरिक सवयींवर जास्त अवलंबून असतो.

तुम्हाला कधी वाटलंय का, हे लोक नेमकं वेगळं काय करतात? खरं तर त्यांच्या आनंदाचं रहस्य त्यांच्या काही छोट्या पण प्रभावी सवयींमध्ये दडलेलं असतं. या सवयी त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवतात, तणाव कमी करतात आणि प्रत्येक क्षणात आनंद शोधायला शिकवतात. आपण कायम खुश राहणाऱ्या लोकांच्या अशाच काही खास सवयींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या आपल्या डेली रुटीनमध्ये स्वतःला लावून घेतल्या तर आपणही अधिक आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो.

मनात एखाद्या प्रकारची अढी किंवा द्वेष ठेवणं म्हणजे जणू विषासमानच आहे. जे लोक नेहमी आनंदी असतात, ते भूतकाळातील कटू आठवणी मागे सोडून 'मूव्ह ऑन' करतात; कारण त्यांना कोणत्याही प्रकारचं भावनिक ओझं वाहण्याची इच्छा नसते.

कायम आनंदी राहणारे लोक आयुष्यातील मजेशीर आणि सुखाचे क्षण असेच वाया घालवत नाहीत; उलट, ते त्या क्षणांचा मनापासून आनंद घेतात आणि ते क्षण आपल्या आठवणींच्या कप्प्यात कायमचे साठवून ठेवतात. यामुळे मनातील सकारात्मकता दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.

नेहमी आनंदी राहणारे लोक जेव्हा अपयशी ठरतात, तेव्हा ते स्वतःला दोष देत बसत नाहीत किंवा स्वतःचा तिरस्कार करत नाहीत. उलट, अशा कठीण प्रसंगी ते स्वतःशी एका खऱ्या मित्राप्रमाणे वागतात. स्वतःला समजून घेणे आणि स्वतःच्या चुकांमधून शिकणे ही त्यांची एक महत्त्वाची सवय असते.

आनंदी राहणारे लोक महागड्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा प्रवास, संगीत कार्यक्रम किंवा नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेण्याला अधिक पसंती देतात. कारण, भौतिक वस्तूंचे मूल्य काळानुसार कमी होत जाते, पण अशा अनुभवांमधून मिळणाऱ्या आठवणी आणि आनंद मात्र काळानुसार अधिक समृद्ध होत जातो. त्यांच्यासाठी 'कलेक्शन'पेक्षा 'मेमरीज' महत्त्वाच्या असतात.

आनंदी राहणारे लोक तंत्रज्ञानाचा किंवा सोशल मिडीयाचा वापर स्वतःची तुलना इतरांच्या यशाशी करण्यासाठी करत नाहीत. त्याऐवजी, ते लोकांशी जोडले जाण्याचे आणि नातेसंबंध अधिक घट्ट करण्यासाठी एक माध्यम म्हणून सोशल मिडियाकडे पाहतात. दुसऱ्यांच्या प्रगतीमुळे स्वतःला कमी लेखण्यापेक्षा, ते स्वतःच्या कौशल्यांवर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे पसंत करतात.

नेहमी आनंदी राहणारे लोक समोरच्या व्यक्तीचे म्हणणे मनापासून आणि लक्षपूर्वक ऐकून घेतात. केवळ स्वतःला काय बोलायचे आहे, यासाठी आपली पाळी येण्याची वाट पाहण्यापेक्षा, ते समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याला आणि त्यांच्याशी मनापासून जोडले जाण्याला जास्त महत्त्व देतात. संवाद साधण्याची हीच पद्धत त्यांना इतरांच्या जवळ नेते.

नेहमी आनंदी राहणारे लोक झोपण्यापूर्वी सोशल मिडीयावर काहीही नकारात्मक पाहण्यापेक्षा, दिवसभरात आपल्यासोबत कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या यावर विचार करतात. ही साधी सवय त्यांच्या मेंदूला पुढच्या दिवशीही सकारात्मक गोष्टी शोधण्यासाठी तयार करते. चांगल्या गोष्टी, आठवणी किंवा सकारात्मकतेने दिवसाचा शेवट केल्यामुळे त्यांना शांत झोप लागते आणि मनावरचा ताण हलका होतो.