कांदा-बीट लोणचं- रंग अप्रतिम सुंदर, पोटभरीचं सॅलेडही! उन्हाळ्यासाठी स्पेशल एकदम सोपी रेसिपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 19:14 IST2025-04-03T15:41:07+5:302025-04-03T19:14:25+5:30

घरी पाहुणे जेवायला येणार असल्यास त्यांच्यासाठी सॅलेड म्हणून काही वेगळा पदार्थ करायचा असेल किंवा आपल्या स्वत:साठी काहीतरी वेगळ्या चवीचं लोणचं किंवा सॅलेड किंवा तोंडी लावण्यासाठीचा एखादा पदार्थ हवा असेल तर ही एक मस्त रेसिपी लगेचच ट्राय करून पाहा.(onion beet root salad recipe)
यामध्ये कांदा आणि बीट रूटचं लोणचं किंवा सॅलेड कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. रेसिपी अतिशय सोपी असून अवघ्या ५ मिनिटांत होणारी आहे.
हा पदार्थ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी कांदे गोलाकार कापून घ्या.
त्यानंतर बीट रुटचे बारीक काप करा. आता एक बरणी घ्या. त्या बरणीमध्ये कांद्याच्या गोलाकार चकत्या सगळ्यात आधी घाला. त्यावर बीटरुट घाला आणि वर पुन्हा कांद्याच्या चकत्या घाला.
आता त्या बरणीमध्ये अर्धा कप व्हिनेगर, १ कप गरम पाणी, चवीनुसार मीठ आणि थोडी मिरेपूड किंवा मिरे घाला. बरणीचं झाकण लावून ती थोडीशी हलवा आणि ६ तासांसाठी तशीच ठेवून द्या.
यानंतर बरणीमध्ये व्हिनेगर आणि पाण्यात मुरलेलं जे काही कांदा आणि बीटरुट सॅलेड तयार झालेलं असेल ते अतिशय उत्कृष्ट चवीचं असेल.
तुम्ही कोणत्याही प्रकारचा मेन्यू केला तरी त्यामध्ये तोंडी लावायला तुम्ही हा पदार्थ आवर्जून घेऊ शकता. सगळ्यांना नक्की आवडेल.